एनटीएजीआयचा प्रस्ताव : दोन डोसमधील अंतर आठ आठवडे करण्याची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात लसीकरणाचे नियम निश्चित करण्यासाठी सरकारकडून स्थापन टास्क फोर्स एनटीएजीआयने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एनटीएजीआयने कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 8-16 आठवडय़ांदरम्यान दुसरा डोस देण्याच्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली आहे.
सध्या लसीकरण धोरणांतर्गत कोव्हिशिल्डचा पहिला डोस दिल्याच्या 12-16 आठवडय़ांनी दुसरा डोस देण्यात येतो. लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने आतापर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दोन डोसदरम्यान 28 दिवसांच्या कालावधीत कुठलाच बदल केलेला नाही. एनटीएजीआयकडून मांडलेला प्रस्ताव अद्याप लागू
केलेला नाही.
सल्लागार समूहाचा प्रस्ताव जागतिक स्तरावर अलिकडेच झालेल्या वैज्ञानिक अध्ययनांच्या आधारावर मांडण्यात आला आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 8 आठवडय़ांनी दिल्यास आणि 12-16 आठवडय़ांदरम्यान दुसरा डोस देण्यात आल्यावर निर्माण होणाऱया अँटीबॉडीजची प्रतिक्रिया समान असते, असे दिसून आले आहे.
सरकारने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यास लाभार्थींना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस जलद मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जगभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण पुन्हा वाढत असताना देशात अद्याप 7 कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. यापूर्वी 13 मे 2021 रोजी केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱया डोसमधील अंतर 6-8 आठवडय़ांवरून वाढवत 12-16 आठवडे केले होते. यासंबंधी देखील एनटीएजीआयने आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता.