नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोव्हिडविरुद्ध लढय़ासाठी 2 कोटी रुपयांचा निधी प्रदान केला आहे. या स्टार जोडीने ‘केट्टो’ या फंड रेजिंग प्रोजेक्टकडे ही मदत सुपूर्द केली असून संयुक्त प्रयत्नातून एकूण 7 कोटी रुपयांचा निधी एकत्रित करण्याचे त्यांचे उद्दिष्टय़ आहे. एका प्रेस रिलीजमधून विराट-अनुष्का या सेलेब्रिटी कपलने याची माहिती दिली. विरुष्काने नंतर सोशल मीडियावर प्रसारित छोटय़ाशा व्हीडिओच्या माध्यमातून देखील मदतकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
‘विराट कोहली व अनुष्का शर्मा हे ‘ईन धिस टुगेदर’ या हॅशटॅगखाली फंड रेजिंग कॅम्पेन सुरु करत असून यात त्यांनी स्वतः सर्वप्रथम 2 कोटी रुपये प्रदान केले आहेत. केट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवर त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. पुढील सात दिवस हा उपक्रम सुरु राहणार असून यातील देणगीची सर्व रक्कम एसीटी ग्रँटसकडे प्रदान केली जाणार आहे. एसीटी ग्रँटस हे इम्प्लेमेन्टेशन पार्टनर असून ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मनुष्यबळ पुरवणे, लसीकरणाबद्दल जागृती करणे आणि टेलि-मेडिसिन फॅसिलिटी उपलब्ध करुन देणे यात ते अग्रेसर रहात आले आहेत’, असे सदर पत्रकात नमूद आहे.
‘मागील वर्षभरात जी प्रचंड हानी झाली, त्याने आपल्या सर्वांनाच धक्का बसला आहे. एक देश या नात्याने एकत्रितपणे हा लढा लढण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा छोटासा वाटा उचलत आहोत’, असे विराटने यावेळी म्हटले आहे. अनुष्काने लोकांचे हाल पाहून मन व्यथित होत असल्याची प्रतिक्रिया येथे नोंदवली. एसीटी ग्रँटसच्या प्रवक्त्या गायत्री यादव यांनी विराट व अनुष्का यांचे या उपक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.









