लाभार्थीना दुसरा डोस मिळण्यास प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोविड-19 लसीकरण मोहिमेला शनिवारी आणखीनच वेग मिळाला आहे. चार आठवडय़ांपूर्वी लसीकरण मोहीम सरू होण्याच्या पहिल्या दिवशी लस टोचून घेणाऱया अनेकांनी शनिवारी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशभरात 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पहिल्या दिवशी देशभरातील 81 केंद्रांमध्ये 4319 आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली होती. 28 दिवसांनी कोवि लसीचा डोस घेण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्रात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
सरकारनुसार शुक्रवारपर्यंत देशभरात एकूण 77 लाख आरोग्य कर्मचारी आणि पंटलाईन कर्मचाऱयांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील 97 टक्के जण लसीकरणाबाबत समाधानी आहेत. सरकारने 19 जुलैपर्यंत 30 कोटी लोकांना कोविड-19 ची लस देण्याचे लक्ष्य बाळगले आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार भारतात केवळ 26 दिवसांमध्ये 70 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. तर इतक्याच लोकांना लस देण्याकरता अमेरिकेला 27 दिवस तर ब्रिटनला 48 दिवस लागले आहेत.
सरकारच्या आकडेवारीनुसार 8 लाखांहून अधिक लाभार्थीसह उत्तरप्रदेश लसीकरण मोहिमेत आघाडीवर आहेत. त्यानंतर महाराष्ट्र (633519) आणि गुजरात (661508)चे स्थान आहे. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱयांच्या 65 टक्क्यांपेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली आहे. बिहारमध्ये 79 टक्क्यांहून अधिक नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱयांना लस दिली गेली आहे.









