सुरक्षेच्यादृष्टीने लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून वेळेत औषधोपचार न झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सुरक्षेच्यादृष्टीने लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. मात्र दुसऱया वेळेची लस देण्यासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागत आहे.
आरोग्य खात्याने लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच आरोग्य सेतू ऍपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिक ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर जात आहेत. ऑनलाईन ऍपद्वारे दिलेल्या वेळेत जाऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याची तक्रार होत आहे. ऑनलाईनद्वारे नोंदणी केल्यानंतर वेळ देण्यात येत आहे. त्यानुसार ठराविक केंद्रावर नागरिक लस घेण्यासाठी जात आहेत. पण त्या ठिकाणी उद्या या किंवा दोन दिवसांनंतर या असे सांगण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच पहिली लस घेतल्यानंतर 28 ते 45 दिवसांनंतर दुसरी लस घेण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार नोंदणी करून नागरिक दुसरी लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर जात आहे. पण त्या ठिकाणी लस देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
45 दिवसांनंतर या, असे सांगून नागरिकांना परत पाठविण्याचा प्रकार अनगोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरू आहे. काही ठराविक नागरिकांना तसेच आपल्या ओळखीच्या नागरिकांना लस देण्याचा प्रकार अनगोळ आरोग्य केंद्रात सुरू असल्याची तक्रार होत आहे. पहिली लस घेऊन 31 दिवस उलटले. त्यामुळे बुधवारी सकाळी काही नागरिक अनगोळ आरोग्य केंद्रात गेले. पण 45 दिवसांनंतर या असे सांगून नागरिकांना परत पाठविण्यात आले. वास्तविक पाहता 28 दिवसांनंतर दुसरी लस घेण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. तरीदेखील आरोग्य खात्याचे कर्मचारी लस देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
टोकन देण्यासाठी अधिकृत कर्मचारी नाही
आरोग्य केंद्रावर कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्या ठिकाणी टोकन देण्यासाठी अधिकृत कर्मचारी उपलब्ध नाही. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या आणि थेट गेलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करण्याचा उद्देश काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. ठराविक नागरिकांना लस देण्याचा प्रकार सुरू असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना दिलेल्या वेळेतच लस उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे. तसेच आरोग्य खात्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयी दूर करून नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निरसन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









