राज्य सरकारचा जिल्हा प्रशासनांना आदेश
बेंगळूर : राज्यातील विविध जिल्हय़ांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे दहन केल्यानंतर त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबीय विधीपूर्वकअस्थी विसर्जित करण्यासाठी येत नसतील तर सरकारकडूनच सन्मानाने अस्थी विसर्जन करण्यात याव्यात, असा आदेश राज्य सरकारचे सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनांना दिला आहे. कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या अस्थी त्या त्या धर्मानुसार विसर्जित केल्या जातात. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील 4 जणांना कोविड मार्गसूचीनुसार योग्य ठिकाणी अस्थींचे विसर्जन करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तसा आदेश यापूर्वी सरकारने दिला होता. मात्र, काही प्रसंगी मृताच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याने या अस्थींचे सरकारकडूनच सन्मानाने विसर्जित करण्यात येत आहेत. तहसीलदार, जिल्हा प्रशासनांना यासंबंधीच्या सूचना या आदेशपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.









