कोविड-19 हे नाव दिलेला कोरोना विषाणूजन्य आजार गेले पाच महिने संपूर्ण जगाच्या मानगुटीवर बसला आहे. ‘आतापर्यंत काय थोडे साथीचे रोग आले? जातील हेही दिवस असा विचारही काही ‘सकारात्मक’ लोक व्यक्त करतात, पण यांना ‘अति सकारात्मक’ म्हणावे लागेल. आजवर आलेल्या साथीच्या रोगांपेक्षा ‘कोविड-19’ खूप निराळा आहे, अधिक भयावह आहे. प्रामुख्याने अशासाठी की त्याचा संसर्ग खूपच प्रभावी आहे आणि त्यामुळे तो पसरण्याची भीती जास्त आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की या रोगाच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱया माणसांची संख्या नेहमीच्या मृत्यूच्या तुलनेने कमी असूनही त्याची लागण होण्याच्या चमत्कारिक पद्धतीमुळे तो अधिक भयानक रोग ठरला आहे.
आजवर आलेल्या निरनिराळ्या रोगांच्या साथींमध्ये असंख्य माणसांचा मृत्यू झाला, परंतु ‘कोविड-19’ माणसे मारण्याबरोबरच, किंबहुना जास्त ताकदीने संपूर्ण जगातील समाजव्यवस्था बदलण्यात यशस्वी होत आहे. कित्येक संसर्गजन्य आणि स्पर्शजन्य रोग यापूर्वी येऊन गेले, पण शहरेच्या शहरे, जिल्हेच्या जिल्हे आणि राज्येच्या राज्ये पाच पाच, सात-सात आठवडे बंद ठेवण्याची वेळ मनुष्य जातीवर आली नव्हती. ‘कोविड-19’ ने ही वेळ आणली. या बंदमुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली, कोटय़वधी लोक बेरोजगार झाले. हळूहळू उद्योगधंदे सुरू होऊ लागले तरी गेलेला रोजगार सहजी परत मिळणार नाही. कारखाने, दुकाने यात काम करणाऱया सर्व माणसांना पूर्वीप्रमाणे एकाच वेळी कामावर जाता येणार नाही. शहरी भागात आज या बाजूची दुकाने, उद्या त्या बाजूची दुकाने उघडी ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे. सम-विषम तारखांनुसार आलटून-पालटून रस्त्याच्या एकेका बाजूला पार्किंग करण्याची ‘पी-1’, ‘पी-2’ पद्धत असते तशी.
लोक ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळतात की नाही, रस्त्यावर गर्दी का करतात, झुंबड का उडवतात या गोष्टींची चर्चा होतच राहणार आहे. पण गर्दी होत असली तरी जसजसा संसर्गाचा फटका बसू लागेल तसतसे हेच लोक स्वतःहून घरात बसू लागतील. या चमत्कारिक परिस्थितीमुळे संपूर्ण जगातील प्रचलित उद्योगप्रणाली आणि अर्थव्यवस्थेची चाके निरनिराळ्या दिशेने वळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
1980नंतरचा काळ जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे टप्प्यांचा होता. ‘कोविड-19’ चा उद्भव चीनमधून झाल्याची ठाम खात्री वाटत असल्यामुळे जगभरातील उद्योगक्षेत्रात चीनमध्ये गुंतवणूक करणे आणि तिथे उद्योग चालविणे याबद्दल प्रतिकुल भावना निर्माण झाली. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ सारख्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेला ‘लेस ग्लोबलायझेशन’चा काळ आल्याचे वाटू लागले आहे. केवळ चीनमधल्याच गुंतवणुकीचा मुद्दा नाही. प्रत्येक देशातील जनतेतील मोठी संख्या रोजगार गमावू लागल्यामुळे ‘विदेशी गुंतवणुकीला खुले दरवाजे, ‘आऊटसोर्सिंग’ असल्या प्रकारांकडे पाठ फिरवणे अपरिहार्य ठरत आहे. परदेशात कारखाने उभारणे ही गेल्या चार दशकातील महत्त्वाची प्रक्रिया होती, आता तिने ‘रिव्हर्स गिअर’ टाकला आहे. ‘कोविड-19’ मुळे लोकांची क्रयशक्ती एकदम खाली आली. खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आणि खरेदी करू शकणाऱयांची संख्याही कमी झाली. जागतिक मंदीच्या काळात क्षमता कमी होते, पण सहसा संख्या कमी होत नाही. झाली तरी तिची गती खूपच संथ असते. ‘कोविड-19’ ने ही गती अनेक पटींनी वाढवली.
उद्योगक्षेत्रात ‘मोअर ऑटोमेशन’ येणार असा अंदाज ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने व्यक्त केला आह़े भारतात काही रुग्णालयांमध्ये रुग्णांपर्यंत औषधे, भोजन, चहा नेण्यासाठी यंत्रमानव (रोबो) किंवा यांत्रिक ढकलगाडी (ऑटोकार्ट) यांचा वापर सुरू झाल्याच्या बातम्या आपण वाचत़ो, ऐकत़ो यामागील उद्देश रुग्णांशी येणारा थेट संपर्क टाळणे हाच आह़े जेव्हा कारखान्यात उत्पादन केले जाते, तेव्हा अनेक कामगारांचा स्पर्श वस्तूंना होत असत़ो त्या स्पर्शातून होणाऱया विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त स्वयंचलित यंत्रसामग्री ही संकल्पना मूळ धरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़
यांत्रिक मानव काही सगळीकडे माणसासारखा दिसणारा असत नाह़ी मोटार गाडय़ांच्या कारखान्यात तो बगळ्याच्या मानेसारखा दिसतो, मोटारगाडीची काच बसवणारा यंत्रमानव म्हणजे लोखंडी भागांचे अनेक सांधे असलेले पिशाच्चच भासत़े प्रयोगशाळांसारख्या ठिकाणी आणखी निराळ्या स्वरूपाची यंत्रे माणसाप्रमाणे कामे करतात़ ही सगळी मंडळी सर्वत्रच मनुष्यबळाची जागा घेतील़ आगामी काळात यंत्रमानव बौद्धिक आणि धोरणात्मक कामे करण्याची शक्यता जगातील विचारवंतांना वाटू लागली आह़े म्हणजे कंपनी संचालकांऐवजी संचालकांचे यंत्रमानवी प्रतिनिधी बैठक घेत आहेत असे दृश्य मनोरंजनातून वास्तवाकडे येण्याची अवस्था आली आह़े अर्थात ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’ आणि ‘आभासी अभ्यासवर्ग ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ या कल्पना यापूर्वीच वापरात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये चालू वर्षात सुरू होण्याची शक्यता आता मावळली आह़े विद्यापीठे, महाविद्यालये यातून वरचेवर आयोजित होणारी चर्चासत्रे, परिसंवाद, नाना तऱहेची शिबिरे या सर्वांवर गदा आली आह़े अर्थात नाही झाली अशी चर्चासत्रे तरी ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’ च्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतच राहतील, परंतु महाविद्यालयात या चर्चासत्रांचा आणि परिसंवादांना उपस्थित राहणाऱया प्रतिनिधींचा चहा-अल्पोपहार, भोजन या निमित्ताने स्वयंपाकी मंडळींना केटरर म्हणून पाहिजे तर लाखोंचे काम मिळत़े औद्योगिक, व्यापारी, वैद्यकीय, वकिली अशा सर्वच क्षेत्रात दररोज जगभर शेकडो चर्चा सत्रे, परिसंवाद होत असतात आणि त्यासाठी उपस्थित असणाऱयांचा प्रवास, निवास आणि भोजन यातून प्रचंड आर्थिक उलाढाल होत़े एकत्रच यायचे नसल्याने या सेवा पुरवणाऱयांचा रोजगार जगात सर्वत्र बहुधा कायमस्वरूपी धोक्यात आला आह़े
कोविड 19 मुळे सुरक्षेचा विषयही गंभीर बनला आह़े कंपनीच्या फाटकातून, इमारतीच्या प्रवेशद्वारातून, कचेरीच्या दालनाच्या दरवाजातून आत शिरताना कपाळावर फोकस मारून ताप तपासणाऱया ‘गन’ सर्वत्र दिसू लागल्या आहेत़ या रोगाचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याच्या भीतीने मानवी सुरक्षा रक्षकांची जागा यंत्रे घेण्याची शक्यता निर्माण झाली आह़े आज संसर्गाच्या भीतीने बाहेरच्यांना रोखण्यासाठी इमारतीबाहेर बसलेले रखवालदार नोकरी टिकून राहिल्याच्या आनंदात असले तरी सुरक्षेची बदलती संकल्पना त्यांचे भवितव्य धोक्यात आणू शकत़े या सर्व गोष्टींचा परिणाम जगभर बेरोजगारांची संख्या वाढण्यात आणि परिणामी गरीबांचे प्रमाण वाढण्यात हाईल़ चोऱयामाऱया वाढतील़ त्यावर नजर ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी होतील़ बसमधील आसने कमी होतील, चालकांच्या बैठकीवर काणी नसेल, बसगाडय़ा आपोआप चालतील़ तथापि, ही सगळी यंत्रे सुरळीत चालली पाहिजेत याकरिता अहोरात्र काम करणारे प्रचंड मनुष्यबळ लागेल, आणि ती रोजगाराची नवी संधी असेल़ सगळाच काही बेरोजगारीचा अंधार असणार नाही, हा आशेचा किरण!
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601








