कोवाड / वार्ताहर
कोवाड ता. चंदगड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील लोखंडी लॉकर अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल 75 तोळे सोने लंपास केले. लॉकडाऊन काळात घडलेल्या या मोठया चोरीची घटना आज (दि 12) उघडकीस आली. या चोरीने कोवाड भागात खळबळ उडाली आहे.
कोवाड भागात कोरोना महामारीचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे कोरोनाच्या धास्तीने 3 सप्टेंबर पासून कोवाड बाझारपेठ कडकडीत बंद आहे. यामध्ये पतसंस्था ही बंद करण्यात आल्या आहेत. या 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या काळात अज्ञात चोरट्यांनी अभय पतसंस्थेच्या लोखंडी शटरची कुलपे तोडून कॅशीअर रुम मधील लोखंडी लॉकर गॅस कटर च्या सहाय्याने तोडून 12 लाख 45 हजार 720 रु किंमतीच्या 75 तोळे सोन्याच्या विविध वस्तूंवर डल्ला मारला. शनीवारी सकाळी काही ग्रामस्थांना पत संस्थेचे शटर उघडे असल्याचे लक्षात आल्याने चोरीचा संशय बळावला.
दरम्यान, चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए एन सातपूते पोलीस सहकाऱ्यां समवेत कोवाडला तात्काळ दाखल झाले. डी.वाय.एस.पी. प्रशांत अमृतकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूरहून क्रॉईम ब्रँचचे पथक ही दाखल झाले आहे. तर डॉग स्कॉड ने दिवसभरात तपासाच्या दिशने शोध चालू केला होता.
अभय पतसंस्थेचे मॅनेंजर तानाजी भरमाना पाटील यांच्या फिर्यादीनुसार कोवाड पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ए एन सातपूते पुढील तपास करत आहेत.
Previous Articleलॉकडाऊनबाबत अनगोळ येथील बैठक निर्णयाविना
Next Article दुचाकी चोरणाऱया तरुणाला अटक









