वार्ताहर / कोवाड
कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील 20 लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी चंदगड तालुक्यातील महेश ऊर्फ पिंटू सुबराव कोले (वय 37, रा. नेसरी रोड, कोवाड) सुनील उर्फ जान्या रामा तलवार (वय 22, रा. रणजितनगर, कोवाड) व संतोष उर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार (वय 25, रा. सुतारगल्ली चिंचणे) या तिघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे 12 सप्टेंबर रोजी बंद कुलूप चोरटÎांनी तोडून संस्थेतील लॉकर गॅस कटरने कट केले. यातील सुमारे 750 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबतचा गुन्हा चंदगड पोलिसात दाखल झाला होता. तपास करीत असताना या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली. अभय संस्थेतील चोरी महेश उर्फ पिंटू सुबराव कोले याने केली. या माहितीच्या अनुषंगाने पथकाने कोवाड येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशाअंती त्याने साथीदार सुनील तलवार व संतोष सुतार यांच्या सहाय्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून चोरीतील दागिने जप्त केले. त्यामध्ये सोन्याची गंठणे, चेन, अंगठÎा, नेकलेस, टॉप्स, कानवेल, मोहनमाळ, पुतळी हार असे एकूण 390 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले. त्यानंतर आरोपी सुनील व संतोष यांचाही शोध घेऊन मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी चंदगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते, विजय गुरखे, विजय कारंडे, किरण गावडे, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, विठ्ठल मणिकेरी, प्रदीप पवार, संतोष पाटील, नरसिंग कांबळे, चंदू ननवरे, सुरेश पाटील, विनोद कांबळे, सुरेश चव्हाण, रणजित कांबळे, नामदेव यादव यांनी केली आहे.
पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव
अभय पतसंस्थेत तब्बल 20 लाखांवर चोरी झाल्याने चंदगड तालुका हादरला होता. पतसंस्थेत सोनं ठेवण्यावर ग्रामीण भागातील जनतेचा विश्वासच उडाला होता. गत पंधरा दिवसांत कोवाड भागातील अनेक पतसंस्थातून सभासदांनी, कर्जदारांनी आपआपले सोने काढून घेतले होते. त्यामुळे पतसंस्था चालकांचे धाबे दणाणले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आणि चंदगड पोलिसांच्या तत्परतेने 15 दिवसात चोरीचा प्रकार उघडकीस आणल्याने कोवाड परिसरात पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.