वार्ताहर / टोप
लॉकडाऊनमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अडकलेले विविध राज्यातील प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्राकडे होती. त्यानुसार शुक्रवारी दि. ८ मे २०२० रोजी कोल्हापूरातून राजस्थान (नागौरी) येथे विशेष रेल्वे जाणार असून, त्यामधून बाराशे लोक स्वगृही परतणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ व सांगली जिल्हयातील इस्लामपूर, वाळवा व शिराळा तालुक्यात राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तामीळनाडूतील अनेक परप्रांतीय अडकले आहेत. तसेच मतदार संघातील अनेक नागरिक इतर राज्यात अडकले आहेत. अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी संबंधित दोन्ही राज्य सरकारमध्ये समन्वय साधून विशेष गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी खासदार माने यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सुरेश अंगडी, गृह खात्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यानुसार शुक्रवारी दि. ८ मे २०२० रोजी कोल्हापूरातून राजस्थान (नागौरी) येथे विशेष रेल्वे जाणार आहे. यामधून बाराशे जण स्वगृही परतणार आहेत. खासदार माने यांच्या मागणीमुळेच ही विशेष रेल्वेची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे इचलकरंजी रेल्वे कृती समितीने खासदार माने यांचे अभिनंदन केले आहे.
या विशेष रेल्वेने प्रवाशांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करण्यात आली असून, जे निरोगी प्रवासी आहेत, अशांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणार्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहर्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर करण्यात येणार आहे. या रेल्वेचे सॅनिटाईज करण्यात येणार आहे. यावेळी राजस्थान नंतर उत्तर प्रदेश, बिहार, तामीळनाडू राज्यासाठी ही लवकरच विशेष रेल्वे जाईल असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला.