रवींद्र करंडक आंतरराज्य एकांकिका स्पर्धा : उत्कृष्ट अभिनय आसावरी नागवेकर-प्रमोद पुजारी
प्रतिनिधी / देवगड:
शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज नाटय़शाखा आयोजित आंतरराज्यस्तरीय रवींद्र करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेत सर्वच आघाडय़ांवर भरीव कामगिरी करून कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लबच्या ‘इट हॅपन्स’ या एकांकिकेने बाजी मारली. रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेटय़े महाविद्यालयाच्या ‘वन डे सेलिब्रेशन’ने द्वितीय, तर मुंबई येथील मगाधन ग्रुपच्या ‘द एक्सिक्मयुशनर’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. प्रेक्षक पसंती म्हणून मुंबईच्या पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या ‘पैठणी’ एकांकिकेचा गौरव करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रहास मर्गज व चंद्रकांत पाळेकर, सदस्य शैलेश महाडिक, व्ही. सी. खडपकर, प्र. प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांबळे, उपप्राचार्य प्रा. सुरेश कुर्लीकर, पर्यवेक्षिका वालावलकर, सभासद उमेश महाडिक, परीक्षक अजय गटलेवार व राजेश कोळंबकर उपस्थित होते. वैयक्तिक परितोषिकांमध्येही ‘इट हॅपन्स’च्या कलाकारांनीच बाजी मारताना उत्कृष्ट अभिनय स्त्राr व पुरुष भूमिकेचा मान अनुक्रमे आसावरी नागवेकर व प्रमोद पुजारी यांना मिळाला. अभिनय स्त्राr ‘पैठणी’मधील ज्ञानदा खोतला उत्तेजनार्थ प्रथम, ‘निर्वासित’मधील जान्हवी विरमुळे हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. अभिनय पुरुषसाठी ‘वन डे सेलिब्रेशन’मधील गणेश राऊतला उत्तेजनार्थ प्रथम, ‘द ट्रान्स्फर ऑफ पॉवर’मधील सचिन वळंजूला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. ‘इट हॅपन्स’मधील सुदर्शन खोतला उत्कृष्ट लेखक, श्रेयस-अनुपम-संकेत यांना उत्कृष्ट संगीत हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले. ‘निर्वासित’मधील देवेन कोळंबकरला उत्कृष्ट नेपथ्य, ‘वन डे सेलिब्रेशन’मधील तन्मय राऊतला प्रकाशयोजना, ‘द एक्सिक्मयुशनर’मधील अभिजीत जाधवला दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. या सर्वांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, मालवण येथील दहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेला देवगड येथील नाटय़रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रथम क्रमांकास 15 हजार, द्वितीय क्रमांकास 10 हजार, तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. लेखन, अभिनय व संगीत अशा तीनही आघाडय़ांवर उल्लेखनीय कामगिरी करत विजेत्या गायन समाज देवल क्लबच्या कलाकारांना फिरता चषक देऊन गौरविण्यात आले.
स्क्रिप्टही महत्वाचे-राजेश कोळंबकर
अजय गटलेवार व राजेश कोळंबकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कोळंबकर यांनी सांगितले, स्पर्धेचा निकाल फक्त सादरीकरणावर काढलेला नसून प्रामुख्याने स्क्रिप्ट कसे आहे, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सादरीकरण करताना जुन्या गोष्टी केल्या, तरी चालतात परंतु त्या वेगळय़ा पद्धतीने कशा मांडल्या जातात, याकडे पाहिले गेले. अशा मोठय़ा स्पर्धांना सामोरे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
प्र. प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांबळे म्हणाल्या, पुनर्स्थापीत केलेल्या नाटय़शाखेचे हे पाचवे वर्ष असून एवढय़ा कमी कालावधीत देवगडसारख्या लहान शहरात राज्य एकांकिका स्पर्धा आयोजित करणे छोटी गोष्ट नाही. त्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व टीमने एकजुटीने काम केले.









