माणकापूर गावानजीक गुरुवारी दुपारी घडला होता अपघात
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी – हुपरी मार्गावरील माणकापूर गावानजीक झालेल्या अपघातामधील हुपरी (ता. हातकणंगले) येथील जखमी युवा चांदी कारखानदाराचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला. शुभम रामदास पोवार (वय 21, दोघे रा. शिवाजीनगर, हुपरी) असे त्याचे नाव आहे. तर अपघातामधील दुसऱ्या गंभीर जखमी शिवप्रताप आप्पासाहेब कुंडले (वय 18, रा. शिवाजीनगर, हुपरी) या युवकाची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती. या अपघाताची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, जखमी शिवप्रताप कुंडले आणि मयत शुभम पोवार हे दोघे गुरुवारी दुपारी कामाकरीता दुचाकीवरून इचलकरंजीला आले होते. येथील काम संपल्यानंतर हे दोघे सायंकाळी दुचाकीवरून घरी जात असताना त्याच्या दुचाकीला इचलकरंजी – हुपरी मार्गावरील माणकापूर (ता. निपाणी) गावानजीक चार चाकी वाहनाची ठोकर बसली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना रस्त्यावरून जाणार्या नागरिकांनी उपचारासाठी येथील आयजीएम रूग्णालयात दाखल केले. पण दोघांची ही प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात हलविले. तेथून दोघाना ही पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान जखमी शुभम पोवार याचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सदलगा पोलिसात झाली आहे.









