जिल्हय़ासह राज्यात अर्ज संख्या रोडावली
राज्यभरातील 1 लाख 5 हजार जागांसाठी 70 हजार अर्ज
-जिल्हय़ातील 7 हजार जागांसाठी 4 हजार अर्ज
गेल्या पाच वर्षात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल झाला कमी
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
औद्योगिक क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून मंदी असल्याने बेरोजगारीची प्रमाण वाढले आहे. परिणामी अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक डिप्लोमा)साठी राज्यभरात 1 लाख 5 हजार जागा आहेत. त्यापैकी 70 हजार जागांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्हय़ात 21 कॉलेजमध्ये 7 हजार जागांसाठी 4 हजार 168 अर्ज आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील 40 टक्के जागांसाठी अर्जच आलेले नाहीत. यावरून औद्योगिक मंदीचे सावट अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडल्याचे दिसत आहे.
अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात सुरुवातीला कर्ज काढून प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धाही असायची. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरीची हमखास खात्री असायची. सध्या मात्र औद्योगिक क्षेत्रात नोकऱया नसल्याने गेल्या पाच वर्षापासून अभियांत्रिकी पदवी, पदविका अभ्यासक्रमाला उतरती कळा आली आहे. गतवर्षी राज्यभरातील 1 लाख 5 हजार जागांपैकी 55 टक्के तर जिल्हय़ातील 7 हजार जागांपैकी 51 टक्के जागा रिक्त होत्या. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक संस्थांना जागतिक मंदीतून जावे लागत आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेले अभियांत्रिकी क्षेत्रही कोरोनाच्या विळख्य़ात अडकले आहे. त्यातच अभियांत्रिकीच्या विशिष्ट शाखांमध्ये नोकऱयांची संधी नसल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे.
कोरोनानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकऱया मिळण्याचा विश्वास
जागतिक औद्योगिक मंदीमुळे अभियांत्रिकीमध्ये बेरोजगाराचे प्रमाण वाढत आहे. लाखो रूपये खर्च करून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरी नसल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे विज्ञान व वाणिज्य शाखेतून् अकरावी-बारावी अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंदी देतात. तरीही कोरोनानंतर औद्योगिक क्षेत्रात मंदी संपलेली असून, उद्योगधंदय़ात नोकऱया तयार होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी सोडून इतर विभागाकडे जावू नये.
प्रा. शशांक मांडरे (शासकीय तंत्रनिकेतन )
कंपन्यांचे आयटीआयला प्राधान्य
शिक्षण घेवून दरवर्षी जेवढे विद्यार्थी बाहेर पडतात तेवढय़ा औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱया नाहीत. तसेच पॉलिटेक्नीक केल्यानंतर डिग्रीही करावी लागते. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पगाराची अपेक्षा जास्त असल्याने औद्योगिक कंपन्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाच कमी पगारात नोकऱया देतात. सरकारी नोकऱयाही कमी झाल्या आहेत. मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेवूनही नोकरी नसल्याने घरातील पारंपारिक फर्निचरचा व्यवसाय करतो.
शुभम सुतार (माजी विद्यार्थी)









