कोल्हापूरची 2 सुवर्णपदकासह 4 कास्यपदकांची कमाई: सोलापूर 2 सुवर्ण 1 रौप्य पदक: सांगली 1 कास्यपदक
फिरोज मुलाणी / सातारा :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील 70 किलो वजन गटात सेनादलाचा सोनबा गोंगाणे कोल्हापूर आणि 92 किलो वजन सुशांत तांबुळकर कोल्हापूर तसेच सोलापूरचा जोतिबा अटकळे आणि सौरभ इगवे यांनी सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूर, सोलापूरने सुवर्णपदकाने सलामी देत पदक तक्त्यात आघाडी घेतली आहे.
57 किलो गादी गटात आंतरराष्ट्रीय मल्ल सोलापूरचा सौरभ इगवे आणि बीडचा आतिष तोडकर यांच्यातील तुफानी लढतीत गुणांचा फरक खाली वर होत असताना सौरभने आतिषला पराभवाची धूळ चारून सुवर्णपदक खिशात टाकले. आतिष रौप्यपदकाचा मानकरी ठरला. याच गटात अतुल चेचर कोल्हापूर जिल्हा आणि अमोल बोंगार्डे कोल्हापूर शहर यांनी कास्य पदकाची कमाई केली.
57 किलो माती गटात आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ करून सोलापूरच्या जोतिबा अटकळेने पुणे शहरच्या अमोल बालगुडे याच्यावर निर्णायक विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले. अमोलला रौप्य तर कोल्हापूरच्या अक्षय ढेरेला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
70 किलो माती गटात पुणे शहरच्या निखील कदमने सोलापूरच्या संतोष गावडेला पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. संतोषला रौप्य आणि कोल्हापूरच्या निलेश हिरगुडेला कास्य पदक मिळाले.
92 किलो गादी विभागात कोल्हापूरच्या सुशांत तांबुळकरने वर्ध्याच्या उदयसिंह खांडेकरचा 10 विरूद्ध 0 गुणांनी एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक पटकावले. खांडेकरने रौप्यपदक तर नगरच्या केवल भिंगारे आणि सांगलीच्या भारत पवारने कास्यपदक पटकावले. 92 किलो माती गटात बीडच्या अमोल मुंढेने अमरावतीच्या प्रशांत जगतापला पराभवाचा धक्का देऊन सोनेरी कामगिरी केली. प्रशांतला रौप्य तर मुंबई शहरचा सारंग सोनटक्के याला कास्य पदक मिळाले. आज दिवसभराच्या 57, 70 व 92 किलोच्या गादी व माती गटात कोल्हापूरने 2 सुवर्ण, 4 कास्य पदक पटकावले.
45 सेकंदात प्रतिस्पर्धी चितपट
मैदानी कुस्तीत विजयी घोडदौड सुरू असलेल्या वाशिमच्या सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात देखील वरचष्मा कायम राखला. हिंगोलीच्या दिगंबर धुतनरला अवघ्या 45 सेकंदात पराभवाचे पाणी पाजले. या लढतीने प्रेक्षकांची मने जिंकली. माती गटातील ही लढत जिंकून सिकंदरने महाराष्ट्र केसरी किताबासाठी आपण प्रबळ दावेदार असल्याचे आजच्या सलामीच्या लढतीत सिद्ध केले. त्याच्या या नेत्रदीपक विजयामुळे उपस्थित कुस्ती शौकिनांनी जल्लोष करून त्याच्या खेळाचे कौतुक केले. यापुढे माती व गादी गटात डोळय़ाचे पारणे फेडणाऱया कुस्त्या शौकिनांना पहावयास मिळतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
आव्हान संपुष्टात
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अतितटीच्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत सातारा, अतुल पाटील जळगाव, संतोष दोरवड रत्नागिरी, समाधान पाटील सोलापूर, नारायण सोलवनकर सोलापूर, शुभम सिदनाळे कोल्हापुर, आदर्श गुंड मुंबई, पृथ्वीराज मोहोळ पुणे, भरत कराड लातूर, आसिफ शेख औरंगाबद या दिग्गज मल्लांना पहिल्याच दिवशी पराभवाचे तोंड पहावे लागल्याने स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.