-वाघुर्डे, सुळे, कोदवडे ग्रामपंचायतींचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन
-गैरप्रकार लपविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव
प्रतिनिधी/कोल्हापूर
पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील प्राथमिक आरोग्य पथकातील आरोग्य सेविका सुमन शेटे व शिपाई शिवाजी वीर हे दोन कर्मचारी आपले गैरप्रकार लपविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक बळवतकर यांच्यावर वारंवार राजकीय दबाव आणत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसह स्थानिक आमदारांना वैद्यकीय अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती सांगून त्यांची इतरत्र बदली करण्याची मागणी करत आहेत. रुग्णसेवेऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कुरघोड्या करणाऱ्या या दोन कर्मचाऱ्यांची सुळे आरोग्य पथकातून तत्काळ बदली करावी अशा मागणीचे निवेदन पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे, सुळे व कोदवडे ग्रामपंचायतींच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, आरोग्य सेविका सुमन शेटे व शिपाई शिवाजी वीर यांच्याकडून आरोग्य पथकामध्ये सुरु असलेले गैरप्रकार वैद्यकीय अधिकारी डॉ.बळवतकर यांनी रोखले. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांनी बळवतकर यांची परिसरात नाहक बदनामी सुरु केली आहे. डॉ. बळवतकर यांच्याबद्दल लोकप -तिनिधींना चुकीची माहिती सांगून त्यांची सुळे पथकातून अन्यत्र बदली करण्याची त्यांनी मागणी केली आहे. आपले गैरकारभार उघडकीस येऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वारंवार राजकीय दबाव आणला जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या मनमानी वर्तनामुळे आणि आरेरावीमुळे डॉ. बळवतकर यांच्याबरोबरच इतर कर्मचारी आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करून केलेल्या गैरकारभाराबाबत खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी तीन ग्रामपंचायतींच्यावतीने केली आहे. सदर निवेदनाची प्रत सीईओ अमन मित्तल यांच्यासह आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनाही दिली आहे .
रुग्णांना घातली जातेय भिती
सुळे आरोग्य पथकातील आरोग्य सेविका सुमन शेटे व ज्योती हावलदार या दोन कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती सांगून त्यांना भिती घातली जात आहे . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या तपासणीनंतर इंजेक्शनचा चार दिवसांचा डोस घेण्यास सांगितले जाते . पण इतके इंजेक्शन्स कशाला घेताय , किडन्या फेल होतील , अशी त्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना भिती घातली जात आहे . त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीचे स्वतंत्र निवेदन सुळेतील ग्रामस्थ श्रीधर साताप्पा कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . योगेश साळे यांना दिले आहे .
वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली नको
सुळे आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक बळवतकर यांची बदली करण्याच्या मागणीसाठी तेथील तीन कर्मचाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरु आहे . पण डॉ . बळवतकर यांची रुग्णसेवा चांगली असून त्यांची बदली करु नये , या मागणीचे निवेदन सुळे , वाघुर्डे , कोदवडे ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरीकांसह वंचित शेतकरी संघटना व संघर्ष बहुजन सेनेचे अध्यक्ष संतोष सुर्यवंशी व अरूण कांबळे यांनी दिले आहे
Previous Articleचर्चमधील ‘कन्फेशन’वर सुनावणी होणार
Next Article टेरर फंडिंग : लखवीला 15 वर्षांची शिक्षा









