अंधारात सात किलोमीटरची पायपीट ठरली व्यर्थ,अखेर त्याला मृत्युने गाठलेच
म्हासुर्ली / वार्ताहर
सर्पदंश झालेल्या बालकावर रस्त्याच्या अभावामुळे उपचार करण्यास वेळ झाल्याने जीव गमवण्याची ऱ्हद्यद्रावक घटना म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा येथे घडली. यात कु.सुनिल गंगाराम घुरके (वय १५) या बालकाचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यु झाला. सदर घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा हा दुर्गम अशा डोंगरामध्ये वसला असून येथे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ही या ठिकाणी शासन दुर्लक्षामुळे पक्का रस्त्याचा अभाव आहे. अशा दुर्गम धनगरवाड्यावर इयत्ता ७ वी मध्ये सुनिल घुरके हा बालका शिक्षण घेत होता. सध्या कोरोना संकटामुळे गेली सहा महिने सर्व शाळा बंद आहेत, यामुळे सर्व विध्यार्थी घरीच असल्याने घरच्यांना शेतीकामात मदत करतात.
त्याच प्रमाणे बुधवार दि १९ रोजी सुनील दिवसभर आजोबा सोबत जनावरे चारावयास रानात गेला होता. दमून आलेल्यानंतर सुनिल रात्री गाढ झोपेत असताना त्याला सर्पदंश झाला. रात्रीची वेळ आणि मुसळधार पाऊस असल्याने घरातील घुरके कुटुंब पूर्णतः घाबरले. आणि त्यांनी सुनिलवर उपचार करण्यासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मध्यरात्री डोंगरातून पायवाटेने सुमारे सात किमीची पायपीट करत म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथे आणले. आणि तेथून पुढे मोटरसायकलने कोल्हापूर गाठण्यासाठी भरपावसातून प्रवास करण्यास सुरवात केली. मात्र उपचार होण्यास बराच वेळ गेल्यामुळे वाटेत गेल्यावर सदर बालकाची तब्येत बिघडली असतानाही तशाच अवस्थेत त्याला नंतर कोल्हापुरहून खाजगी वाहन वाटेत मागवून घेऊन त्याला दवाखान्यापर्यंत नेण्यात आले.
मात्र दवाखान्यात पोहोचल्यावरही संबंधितांनी सुनिलवर उपचार करण्यास दुर्लक्ष केले. पण बालकाच्या जीवाच्या काळजीपोटी घुरके कुटुंबियांनी आर्त विनवणी करत ठाहो फोडल्यावर संबंधित दवाखान्याच्या प्रशासनाने उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र उपचारास बराच विलंब झाल्याने उपचारादरम्यान सुनिलचा दुदैवी मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुनीलच्या अश्या जाण्याने धनगरवाड्यावर शोककळा पसरली.सुनिलचे वडील श्री.गंगाराम कबु घुरके हे रोजंदारी करून घर चालतात. तर आई दुर्धर आजाराने त्रस्त असून गेले काही महिने अंथरुणास खिळलेली असून सर्व कुटुंबीय तिच्या उपचार आणि सुश्रूतेत व्यस्त असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या घरच्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
Previous Articleकोल्हापूर : गांधीनगर ग्रा.पं.समोर दलित महासंघाचे आंदोलन
Next Article सोलापूर : आमदार सुजितसिंह ठाकूर कोरोनामुक्त









