करवीर पोलिसांची धडक कारवाई, 10 हजार दंड
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गर्दी करुन लग्न करणाऱया दोन मंगल कार्यालयांवर मंगळवारी कारवाई केली. करवीर पोलीसांनी दोन मंगल कार्यालयाच्या मालकांवर 10 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
आंबेवाडी (ता. करवीर) येथील दत्त समर्थ मंगल कार्यालय येथे गर्दी करुन सुरु असलेल्या लग्न कार्यालयावर करवीर पोलिसांनी छापा टाकला. 50 पेक्षा जास्त नागरीकांच्या उपस्थितीमध्ये लग्न कार्य सुरु असल्याने दत्त समर्थ मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मंगल कार्यालयाचे मालक रामचंद्र बाबुराव कचरे (वडणगे ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन 10 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी सकाळी बालिंगा रोडवरील नागदेवाडी (ता. करवीर) येथील वसंत हरी हॉल येथे लग्न सुरु होते. करवीर पोलीसांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येथे छापा टाकला. यावेळी 50 पेक्षा जास्त नागरीकांच्या उपस्थितीमध्ये लग्नसोहळा सुरु होता. यामुळे कार्यालयाचे मालक सुनिल वसंतराव जाधव यांच्यावर 10 हजार रुपये दंडाची कारवाई केली. करवीर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जरळी, पोलीस नाईक पोतरे, यांनी ही कारवाई केली.









