अनेक मार्गावर महापुराचे पाणी, प्रशासन यंत्रणा सज्ज
एकोचाळीस गावातील तीस हजारांहून अधिक नागरीक स्थलांतरित
प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 39 गावातील 28 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. तर दहा हजारांहून अधिक जनावरांनाही हलविण्यात आले आहेत. श्री गुरुदत्त टाकळी वाडी, शिरोळ श्री दत्त बरोबरच पद्माराजे विद्यालय शिरोळ उदगाव हायस्कूल व जयसिंगपूर येथे सोय करण्यात आली आहे. शिरोळ शहरांमधील दसरा चौक, जावईवाडी या ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शिरोळ शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पद्माराजे विद्यालयात दाखल करण्यात आलेल्या पूरग्रस्त नागरिकांची जेवणाची राहण्याची सोय शहरातील वाघाचे युवा ग्रुपचे कार्यकर्ते व अन्य तरूण मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत.
चार दिवस झाले शिरोळ तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पंचगंगा वारणा कृष्णा दुध गंगा पात्रातील पाणी बाहेर पडते असुन अनेक गावांना महापुराने वेढा घातला आहे. पूरबाधित असलेल्या गावांतील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या जादा तुकड्या शिरोळ मध्ये दाखल झाल्या आहेत.
प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत कवठेसार जुने, अ.लाट, दानोळी, अर्जूनवाड कुरुंदवाड या भागातील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहेत सध्या कुरुंदवाड, खिद्रापूर या गावा करिता दोन-दोन यांत्रिक बोटी तर कवठेगुलंद, कवठेसार या ठिकाणी एक-एक यांत्रिक बोटी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गरज भासल्यास अन्य सात यांत्रिक बोटी राखीव ठेवल्या आहेत. एनडीएफआरचे जवान सज्ज झाले आहेत.
शिरोळ तालुक्यातील अनेक मार्गावर महापुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत तर पुर क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांनी स्थलांतरित होत आहेत.
तालुक्यातील ५४ पैकी ४५ गावांना महापुराचा फटका बसणार बसण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. काही लोक तात्पुरत्या स्वरूपाच्या खोल्या भाड्याने मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
ना राजेंद्र पाटील-यड्रावकर दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील सभापती दिपाली परीट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पूर बाधित क्षेत्रातील कार्यकर्त्यांना व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आव्हान करून दिलासा देत असल्याचे चित्र दिसून येते.