प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील बाबुराव कुंडलिक पाटील यांच्या गोठ्यास आग लागून जवळपास ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार बाबुराव कुंडलिक पाटील यांचे घरात वेल्डिंगचे काम चालू होते. शेजारीच त्यांचा जनावरांचा गोठा होता. सदर गोठ्यामध्ये जनावरांना पावसाळ्यामध्ये घालण्यासाठी वाळका गवताचा चारा रचून ठेवला होता. वेल्डिंगचे काम चालू असताना त्यामधील ठिणगी गवताच्या गंजीवर पडल्याने पेट घेतली. सदर बाब लक्षात येताच प्रथम जनावरांना दोर कापून बाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांनी पाणी मारून आग विझवली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण जनावराच्या गोठ्याचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले.
पशुपालन हा शेतकऱ्याचा दुय्यम व्यवसाय आहे. यावर्षी कोरोनाव्हायरस मुळे जागतिक बाजारपेठेमध्ये मंदी निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याच्या मालास योग्य हमीभाव नाही. त्यामुळे पशुपालन करत आपल्या संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गातून होत असतो. शेतकरी पूर, अतिवृष्टी, रोगराई,आग अशा अनेक नैसर्गिक संकटाशी सामना करत आपल्या जनावरांची देखभाल व शेती करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालास योग्य हमीभाव व जनावरांना विमा संरक्षण या दोन बाबी वरती विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्यात जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.