..’हाजीर तो वजीर’ यामुळे लसीकरणाचा बोजवारा…
मर्जितल्या लोकांनाच प्रथम प्राधान्य.. ग्रामस्थांतून संताप…
प्रतिनिधी / शिरढोण
शिरढोण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नियोजन अभावी व मनमानी कारभारामुळे कोरोना लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. मर्जितल्या लोकांनाच लस देण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. हाजीर तो वजीर याप्रमाणे लसीकरण सुरू असल्यामुळे लोकांत नाराजी आहे.पहिला व दुसरा डोस वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाच्या सुरुवाती पासूनच वाद विवादाचे प्रसंग घडले आहेत. लसीकरणाबाबत नियोजनाचा अभाव
व मनमानी कारभार यामुळे शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावापेक्षा शिरढो.ण येथे लसीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे.आजअखेर केवळ 46.65 टक्के इतके लसीकरण झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून मिळणारा अपुरा लस पुरवठा आणि येथील नियोजनशून्य कारभार यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. लस येण्या आधीच लसीकरणाची यादी तयार असते अशी चर्चा जोर धरली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही जमेत धरा साहेब असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
लसीकरणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर दिसून येत नाही. शिवाय जबाबदार लोकही मास्कचा वापर करताना दिसून येत नसल्यामुळे लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. गावातील दक्षता कमिटी व लोकप्रतिनिधींनी यामध्ये तातडीने लक्ष घालून आरोग्य विभागाचा सुरू असलेला सावळागोंधळ थांबवावा अशी मागणी गोरगरीब जनतेतून होत आहे. तसेच रीतसर व नियोजनबद्ध लसीकरण सुरू ठेवा अशी माफक अपेक्षा व्यक्त आहे.









