प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरात 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. उद्यमनगर येथील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. रेडिमेड कापड असोसिएशनने बैठकीच्या प्रारंभीच जनता कर्फ्यूला विरोध दर्शविल्याने हमरी-तुमरी झाली. अखेर कापड व्यवसायिक नाराजी व्यक्त करत बैठकीतून निघून गेले. तर किराणा, भुसारी, मसाले, भाजीपाला यासह अन्य व्यवसायिकांनी जनता कर्फ्यूला पाठींबा दर्शविला. जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, औषध दुकान, दूध आणि बँका सुरु राहणार असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जाहीर केले.
शहरासह जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हि साखळी तोडण्यासाठी जिल्हय़ातील आठ तालुक्यांमध्ये स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यांसोबत शहरातही जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. याला चेंबरसह सलंग्नित अन्य 42 असोसिएशनने पाठींबा दर्शविला.
रेडिमेड कापड व्यवसायिकांच्या विरोधाने वादावादी
बैठकीच्या प्रारंभी कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान कडक बंद पाळण्याचे आवाहन चेंबरचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आनंद माने यांनी केले. यावेळी माने यांच्या आवाहनाला रेडिमेड कापड व्यवसायिकांनी विरोध दर्शविला. लॉकडाऊन केवळ व्यवसायिकांवर लादला जात आहे. लॉकडाऊनकाळात विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. प्रशासन त्यांचे अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन करत आहे. आता किती कर्ज काढायचे, अशी भुमिका घेत रेडिमेड कापड व्यवसायिक अजय मेहता, अमित केसवाणी यांच्यासह इतरांनी जनता कर्फ्यूला विरोध केला. यामुळे वादावादीस प्रारंभ झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तुमचे समाजासाठी योगदान काय, फक्त व्यापार पाहू नका, असे कापड व्यवसायिकांना बैठकीमध्ये सुनावण्यात आले. यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीमधून माघार घेतली.
अन्य 42 असोसिएशनचा पाठींबा
बैठकीमध्ये किराणा-भुसारी, मसाला ग्रेन मर्चंट असोसिएशनने जनता कर्फ्यूला पाठींबा दर्शविला. तर ग्रेन मर्चंट असोसिएशनने चेंबर निर्णय मान्य असल्याचे सांगत धान्य बाजार 11 ते 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. यासह अन्य 42 असोसिएशनने या निर्णयाला एकमताने पाठींबा दिला.
मेडिकलमध्ये अन्य वस्तू विक्रीवर बंदी घाला
जनता कर्फ्यूला सर्व व्यापाऱयांनी पाठींबा दिला आहे. यामध्ये शहरातील औषधे दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र काही औषध दुकानांमध्ये चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड्रींक्स् आदी वस्तूंची विक्री सुरु आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी यावस्तू खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे औषध दुकानांमध्ये औषधांव्यतिरिक्त अन्य वस्तु विक्रीवर बंदी घाला अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली.
ऍडव्हान्स टॅक्ससाठी बँका सुरु राहणे गरजेचे
ऍडव्हन्स टॅस्क भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. यानंतर दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपुर्वी टॅक्स भरणे आवश्यक आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूमध्ये बँका सुरु ठेवण्याबाबत प्रशासनाकडे विनंती करणार असल्याचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.
Previous Articleस्टेट बँक 14 हजार जणांची भरती करणार
Next Article रिलायन्सची ऑईल-केमिकल व्यवसायासाठी स्वतंत्र योजना









