तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित, इंजेक्शनच्या तीन बाटल्यांसह लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्गावरील रेमडेसीवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून रेमडेसीवीरच्या तीन बाटल्या व अन्य साहित्य असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. औषध निरीक्षक सपना घुणकीकर यांनी त्यांच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सचिन दौलत जोगम (वय 30, रा. कणेरकर नगर, सानेगुरुजी वसाहत, मूळ गाव गोतेवाडी, धामोड, राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे (वय 25, रा. मराठा बोर्डिंग हाऊस, मूळ गाव इस्लामपूर जि. सांगली), प्रकाश लक्ष्मण गोते (वय 25 रा. राजोपाध्ये नगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कोरोना महामारीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या संधीचा फायदा घेऊन या इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. येथे एक इंजेक्शन 23 हजार रुपयांना विकले जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्हे शाखेसह अन्न औषध प्रशासनाचे पथक तयार करुन बागल चौकातील पेट्रोल पंपाशेजारी सापळा लावला होता. यावेळी याठिकाणी जोगम व खैरे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता दोघांकडे इंजेक्शनच्या तीन बाटल्या सापडल्या. कसून चौकशी केली असता जोगमने मित्र प्रकाश गोते व खैरे याच्याकडून हे इंजेक्शन घेऊन विकत असल्याची माहिती दिली. या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून तीन रेमडेसीवीर इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या. औषध किंमत नियंत्रण कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनयम कायद्याचे उल्लंघन, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदÎाचे उल्लंघन या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, अर्जुन बंद्रे, संतोष पाटील, महेश गवळी, अजय काळे, सुनील कवळेकर, प्रदीप नाकील आणि अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक सपना घुणकीकर यांनी ही कारवाई केली.
हॉस्पिटलमधून इंजेक्शन काळ्याबाजारात
प्रणव खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असून मंगळवार पेठेतील शरण्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. याठिकाणी रुग्णांवर उपचार करतेवेळी शिल्लक राहिलेली रेमडेसीवीर इंजेक्शन जादा दराने मेडिकलमध्ये नोकरी करणाऱया जोगमला विकत होता. प्रकाश गोते हाही वालावलकर हॉस्पिटलमधील इंजेक्शन जोगमला विकत होता. अशा प्रकारे त्यांची चेन सुरु होती.









