सातवेच्या तरुणाचा संघर्षमय प्रवास : आर्थिक, कौटुंबिक अडचणींवर केली मात
दीपक चौगले / कोल्हापूर
कॉलेजला असताना वडिलांच छत्र हरपलं. त्यानंतर एकामागून एक संकटांची मालिका. घरगाडा चालवायचा कसा हा प्रश्न पाचवीलाच पुजलेला. त्यावर मात करण्यासाठी त्याने रिक्षा चालवण्याचा मार्ग पत्करला. प्रामाणिक, संकटकाळी नेहमी मदतीला धावणे या गुणांवर सातवे. (ता. पन्हाळा) येथील अमर दाभाडे या युवकाची 2005 मध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाली. दरम्यानच्या काळात संसारवेलीवर दोन फुलं फुलली मात्र काही वर्षांतच नियतीने डाव खेळला अन् त्याची पत्नी त्याला कायमची सोडून गेली. या दु:खातून सावरत, इच्छा नसतानाही 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीला पुन्हा सामोरा गेला आणि थेट रिक्षा ड्रायव्हरच्या सीटवरून तो सरपंचपदाच्या खुर्चीवर जाऊन बसला. मात्र हे यश पाहायला वडील आणि बायको नसल्याची सल त्याला आजही बोचत राहते.
2005 च्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर अमर दाभाडे याला त्याच्या वॉर्डातील नागरिकांनी निवडणुकीस उभे राहण्याचा आग्रह धरला आणि पहिल्याच प्रयत्नात विजय प्राप्त करत सातवे ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाली. दरम्यानच्या कालावधीत वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी अमर याच्या खांद्यावर येऊन पडली. छोटे-मोठे व्यवसाय करत घरगाडा चालू होता. दरम्यान त्याचा विवाह झाला. संसारवेलीवर दोन फुलं फुलली. ग्रामपंचायत सदस्य असताना रक्तदान शिबीर, पूरग्रस्तांना मदत, नागरिकांना संकटकाळी मदत करणे हे त्याचे काम सुरू होते. मात्र कुटुंब चालवताना आर्थिक घडी विस्कटत होती. शिक्षण एमएपर्यंत होऊनही हाताला काम नव्हते. अखेर गाडी चालवण्याच्या पूर्वानुभवावर रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
वडापच्या रिक्षामधून रोजच्या अर्थार्जनाचा प्रश्न मिटत होता. घरामध्ये हळूहळू स्थैर्य येत होते. मात्र नियतीने डाव साधला आणि अमर कोलमडून पड़ला. दीड वर्षांपूर्वी ऐन गणेशोत्सवात विजेच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू झाला. हा मोठा आघात सहन करत त्याने आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले. 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर त्याच्या वॉडातील नागरिकांनी पुन्हा एकदा अमरला निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह धरला मात्र पत्नीच्या निधनामुळे एकाकी पडलेल्या अमरने यासाठी अनुत्सकता दाखविली. अखेर नागरिकांच्या वाढत्या आग्रहाखातर निवडणुकीला तो सामोरा गेला आणि विजयाची माळ पुन्हा एकदा गळ्यात पडली. यावेळी सरपंचपदासाठी आरक्षण पडले होते. या पदासाठी चढाओढी, कुरघोडीचे राजकारण सुरू होते. अखेर या सर्वांवरही मात करत अमरने सरपंचपदाची खुर्ची मिळवली.
| सातवे गावच्या विकासासाठी कटिबद्ध सातवे एसटी स्टँड परिसर, शिवाजी चौक परिसराचे सुशोभीकरण, महिलांसाठी स्वच्छतागृह, ऐतिहासिक तळ्याचे सुशोभीकरण आणि तेथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा मानस आहे. – अमर दाभाडे, सरपंच सातवे |









