प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी येथे सांगावकर यांच्या मळ्याजवळ चार दिवसापूर्वी हरेल पक्षी मृतावस्थेत आढळला असतानाच आज पनोरी येथे बगळा व कावळा हे दोन पक्षी मृतावस्थेत पडलेले दिसून आले. लागोपाठ झालेल्या तीन पक्षांच्या मृत्यूने पक्षीप्रेमीतून चिंता व्यक्त केली जात आहे. या पक्षांच्या मृत्यूचे कारण शोधणे गरजेचे असून संबंधित विभागाने याची दखल घेऊन सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. तीन पक्षांचा मृत्यू कशाने झाला हे माहीत नसले तरी बर्ड फ्ल्यूची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच योग्य पाहणी करुन उपाययोजना करावी अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केली आहे.
चार दिवसापूर्वी हरेल जातीचा पक्षी सांगावकर यांच्या मळ्याजवळ मृतावस्थेत पडला होता. मृतावस्थेत आढळलेल्या पक्षाची माहिती सुर्यवंशी यानी वनविभागाला दिली. त्या पक्षाला वन अधिकारी कांबळे यांच्याकडे दिले. मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ही घटना ताजी असतानाच आज पनोरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ कावळा मृतावस्थेत दिसून आला. तर गावातच बगळा ही मृतावस्थेत पडलेला दिसला. तालुक्यात तीन पक्षांचे मृत्यू नेमके कशाने झाले हे माहीत नसले तरी संबंधित विभागाने त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. पक्षांच्या आकस्मिक मृत्यूची तात्काळ नोंद घेऊन पुढील धोका टाळावा अशी मागणी सुर्यवंशी -सरकार यांनी केली आहे.
Previous Articleसातारा पालिकेचे 307 कोटींचे बजेट मंजूर
Next Article राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र; म्हणाले…









