सांगरूळ / वार्ताहर
कोल्हापूर येथे होणारा महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यस्तरीय महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील होते. कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै. गणेश मानुगडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचा राज्यस्तरीय महामेळावा रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी श्री दत्त समर्थ सांस्कृतिक भवन, पन्हाळा रोड, शिवाजी पुल आंबेवाडी कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. याच्या नियोजनासाठी जिल्हा कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना पै. गणेश मानुगडे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीकला वाढीस लावण्याचे कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे प्रमुख ध्येय आहे. राजश्री शाहू महाराजांनीही कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरची कुस्ती सातासमुद्रापलीकडे जागतिक स्तरावर पोचविण्याचे काम केले आहे. शाहू महाराजांच्या नगरीत कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा पहिला राज्यस्तरीय महामेळावा होत आहे हे अभिमानास्पद आहे.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक करताना कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पै. संग्राम कांबळे यांनी कुस्तीमल्लविद्या महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कुस्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण भारतभर ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कुस्ती क्षेत्राच्या या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज आजी-माजी पैलवान उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या वस्ताद मंडळींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी पैलवान वस्ताद व कुस्ती शौकीनानी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन पै. संग्राम कांबळे यांनी केले आहे.









