अन्य तीन रूग्णांवर उपचार सुरू, यंत्रणा हादरली, जिल्ह्यात प्रथमच `म्युकर’चा संसर्ग अन 4 मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात म्युकर मायकोसीस संसर्गित काही रूग्ण उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त कोमॉर्बीड रूग्णांत `म्युकर मायकोसिस’चा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच या संसर्गाने जिल्ह्यात मंगळवारी चौघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. अन्य तीन रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. बुरशीजन्य साथ असल्याने त्यावर नियंत्रण शक्य आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत `म्युकर मायकोसिस’ रूग्णांची संख्या कमी होती, पण दुसऱया लाटेत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान, श्वासनलिकेत फंगस इन्फेक्शन (बुरशी संसर्ग) होते. त्याला `म्युकर मायकोसिस’ म्हणतात. गुजरातनंतर राज्यात म्युकर मायकोसिसचे रूग्ण दिसून आले. गुजरातमध्ये 9 जणांचा म्युकर मायकोसिसने बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत म्युकर मायकोसिसचे रूग्ण दिसून आले आहेत, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी म्युकर मायकोसिस संसर्गित असलेल्या चौघांचा उपचार सुरू असता मृत्यू झाला. जिल्ह्यात प्रथमच म्युकर मायकोसिसने चौघांचा बळी घेतला आहे. या मृत्यूची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. म्युकर मायकोसिसचे अन्य तीन रूग्ण गंभीर आहेत. त्यामध्ये एक इचलकरंजीत तर दोन कोल्हापूर शहरात उपचार घेत आहेत. या तीन रूग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्न सुरू केल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
कोरोनावरील उपचारादरम्यान रूग्णांना दिल्या जाणाऱ्या स्टेरॉईड ड्रगमुळे रूग्णाची रोगप्रतिकारक क्षमता खालावते. ते `म्युकर’वाढीसाठी कारणीभूत ठरतात. नाकावाटे चेहऱ्यामध्ये बुरशी जमा होते. म्युकर मायकोसिसचा सर्वाधिक धोका मधुमेहींना आहे. म्युकर मायकोसिसचे निदान नाक व घशातील स्वॅबद्वारे केले जात असल्याची माहिती तज्ञांनी दिली.