पुलाची शिरोली/वार्ताहर
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हि मोहीम पुलाची शिरोलीत व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरुवात झाली आहे. पाच दिवसांत बारा हजार लोकांचा सर्वे पूर्ण झाला आहे. या मोहिमेत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा उत्सफूर्त सहभाग हि उल्लेखनीय बाब आहे.
शिरोली गावात ६३०४ घरांतील संपूर्ण लोकांचा सर्वे पूर्ण केला जाणार आहे. दररोज सुमारे अडीच ते तीन हजार लोकांचा सर्वे पूर्ण केला जात आहे. याकरिता गाव कामगार तलाठी निलेश चौगुले, ग्रामविकास अधिकारी ए.एस.कठारे व कृषी अधिकारी प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागवार बारा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये कोतवाल संदीप पुजारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवीका, मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक घरात जावून कुटूंबातील लोकांची उपलब्ध साधनांच्या आधारे प्राथमिक तपासणी करून नोंदी घेत आहेत. हि सर्व माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर पाठवण्याचे काम ग्रामविकास अधिकारी तत्काळ करीत आहेत. यासाठी त्यांनी संगणक प्रतिनिधींची निवड केली आहे.
तलाठी निलेश चौगुले , ग्रामविकास अधिकारी एस.एस.कठारे व कृषी अधिकारी प्रमोद कांबळे हे तिनही शासकीय अधिकारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरोघरी जावून सर्वेचे काम करत आहेत. तसेच जेवणाच्या वेळेत नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून आपले कर्तव्यही पार पाडत आहेत. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
या मोहिमेचा शुभारंभ सरपंच शशिकांत खवरे ,स.पो.नि. किरण भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अॅंन्ड्रूस, उपसरपंच सुरेश यादव , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, संग्राम कदम, विनायक कुंभार व सदस्य आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
Previous Articleकोल्हापूर : कुंभोज येथे पाच दिवसाच्या ‘जनता कर्फ्यू’ला सुरुवात
Next Article शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष : देवेंद्र फडणवीस









