महापालिका निवडणूक 2021 ः राज्य निवडणूक आयोगाकडून शेखर गायकवाड यांची नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादी तयार झाली असली तरी काही त्रुटी राहू नये, यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी निरीक्षक म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत गायकवाड कोल्हापूर दौऱयावर येणार असून त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, त्यावरील हरकती, सूचना घेण्यात आल्या. त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली. ती जाहीर केल्यानंतर त्यावर आक्षेप, हरकती, तक्रारी करणाऱया तब्बल 1800 हरकती आल्या. त्यामुळे मतदार यादीची प्रक्रिया वादाच्या भोवऱयात सापडली. अनेक प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागात जाणे, नावे गायब होणे आदी प्रकार घडल्याने महापालिका प्रशासन आणि निवडणूक कार्यालय वादाच्या केंद्रस्थानी आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील कोल्हापूरसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आदी महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत वाढवून दिली.
त्यामुळे कोल्हापूरू महापालिकेच्या प्रशासनालाही वेळ मिळाला. या काळात निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता, शहर अभियंता कार्यालय, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना ऍक्टीव्ह केले. पण बीएलओ स्तरावर मतदारांची नावे समाविष्ट करताना निर्माण झालेला गोंधळ दुरूस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाला प्रचंड कष्ट करावे लागले आहे. काही त्रुटी निघाल्या नसल्याने प्रशासक डॉ. बलकवडे यांनी अधिकाऱयांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी बारीक सारीक तपशिल पाहण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून निरीक्षक नियुक्त
दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीपूर्वी त्याची पाहणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. ते कोल्हापुरात लवकरच येणार असून त्यांनी पाहणी केल्यानंतर महापालिका प्रशासन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविणार असून आयोगाच्या सूचनेनुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे.