आरक्षण स्थगिती निर्णयानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया
शिक्षण आणि शासकीय नोकरीची हुकणार संधी
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्यांचे मानसिक खच्चीकरण
सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात पडसाद उमठत आहेत. शिक्षणतज्ञ, मराठा संघटना, विद्यार्थी, युवक-युवती यांच्यामधून मराठय़ांच्या पोरांनी मरायचं काय? अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी वेळी सशक्त प्रतिवाद न केल्याने न्यायमूर्तींनी आरक्षणाला स्थगिती दिल्याची भावनाही व्यक्त होत आहे. आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा रस्त्यावरील लढाईच्या तयारीत समाज आहे. स्थगितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. तर आरक्षणामुळे शासकीय नोकरीची संधी मिळालेल्यांचे पुढे काय, असाही प्रश्न आहे. भविष्यात आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होईल, यादृष्टीने सरकारने तयारी करुन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, असेही मत व्यक्त होत आहे.
मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळणे गरजेचे
स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकर्यांमध्ये केवळ आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थींचे नुकसान होत आहे. गुणवत्ता असून ही आरक्षणा अभावी वर्षभर घेतलेले कष्ट वाया जात आहे. यामधून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. स्थगीतीच्या निर्णयाने स्पर्धा परीक्षा संधीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने बेडरपणे समोर येत प्रचंड राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर केंद्र सरकारला विश्वासात घेत मराठा समाजाला त्यांच्या हक्काच आरक्षण मिळवून देणे गरजेचे आहे.
– अक्षय पाटील, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
स्वार्थी मराठा राजकारण्यांना जागा दाखवून द्या
मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने विशेषतः समाजातील विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. कायद्याच्या नावाखाली कोटय़वधी मराठय़ांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. मराठा समाजाबाबत वापर करा आणि फेकून द्या, अशी मानसिकता राजकारण्यांची आहे. त्यामुळे स्वार्थी राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहीजे. तसेच समाजातील युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– धनाजी सावंत, संशोधक, सारथी संस्था.
स्थगितीमुळे नोकरभरती बाबत संभ्रम
मराठा आरक्षण हा मराठा समाजातील मागास विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. तरी आरक्षणावरुन राजकारण न करता सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी. एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आज अनेक अडचणीमधून जात आहेत. स्थगितीच्या निर्णयाने नोकर भरतीला लगाम लागला आहे. यामुळे भरती प्रक्रियेबाबत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने याबाबत तत्काळ स्पष्टीकरण द्यावे.
– सचिन चव्हाण, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान
स्थगितीचा निर्णय मराठा समाजाला पुन्हा मागे घेवून जाणार आहे. आरक्षणामुळे युवक-युवतींना शैक्षणिक प्रवेश प्रक्रीया आणि शासकीय नोकऱयांमध्ये संधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र स्थगितीचा निर्णय अत्यंत दूर्देवी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होईल. युवा पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. तसेच पुढील काळात आरक्षणासाठीच्या संघर्षामध्ये अखेरच्या श्वासापर्यंत समाजाबांधवांच्या सोबत राहणार आहे.
– अवधूत पाटील, युवक अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आघात
आरक्षण स्थगितीचा सर्वप्रथम फटका आकरावी प्रवेश आणि स्पर्धा परीक्षा तयारीच्या अंतिम टप्प्यात असणार्या विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोनामुळे अगोदरच सर्वांची मानसिकता बिघडली आहे. अशा वातावरणातही मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा होती. मात्र स्थगितीच्या निर्णयामुळे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकर भरती या प्रक्रियेमध्ये असणाऱया विद्यार्थ्यांवर मानसिक आघात झाला आहे. पुढील काळात आरक्षणाबाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागेल. मात्र तोपर्यंत स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान न भरुन निघणारे आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
– प्राचार्य डॉ. जे. के. पवार, ज्येष्ठ अर्थतज्ञ.
मराठाआरक्षणालास्थगितीका?
आर्थिक निकषावर इकॉनॉमिकल विकर सेक्शन (इडब्ल्यूएस) चे दहा टक्के आरक्षण देशात लागू होते. पण मागासवर्गीय आयोगाच्या सकारात्मक अहवालानंतरही मराठा आरक्षणाला स्थगिती का? विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान करणारा हा निर्णय आहे. स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यावरील विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त होणार आहे. स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान सरकार भरुन काढणार का? त्यामुळे आरक्षणाबाबत फेरविचार करुन सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
– श्वेता देसाई, युवती.
मराठा समाजाच्या वाटाल्या अवहेलना
राज्यातील बहुसंख्य असणाऱया मराठा समाजाने आजवर सामाजिक जाणतेपणा ठेवला आहे. पण पिढय़ानंपिढय़ा मराठा समाजाच्या वाटय़ाला शैक्षणिक आणि सरकारी सुविधांच्या बाबतीत अवहेलनाच वाटय़ाला आली आहे. हाच निर्णय भविष्यात कायम राहिला तर आर्थिक दृष्टय़ा मागास विद्यार्थी आत्महत्येकडे प्रवृत्त होतील.
– सोनाली पाटील, संशोधक सारथी संस्था.