नगराध्यक्षाच्या हस्ते पाण्याचे पूजन
प्रतिनिधी/पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या ऐतिहासिक शाहूकालीन श्री महालक्ष्मी तलाव पुर्ण क्षमतेने भरला. यामुळे दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा या तलावात झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या धुवाँधार पावसामुळे तलावात पाणी येवून तलावाची पाणी पातळी आज ३१ फुटावर जावून तलाव ओव्हर फ्लो झाला. या पाण्याचे पूजन वडगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष माळी म्हणाले, वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तलावात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातून पाणी यावर्षी तलावात आले. गेल्या महिनाभरात पडलेल्या पावसामुळे तलावाची पाणी पातळी वाढली होती. रविवारी रात्री धुवाधार पडलेल्या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला.तलावात आलेल्या पाण्यामुळे वारणा नदीवरून पाणी पुरवठ्यासाठी असलेला ताण आणि खर्च याची बचत होणार आहे. या तलावात पाणी आल्यामुळे वडगाव शहरवासियात आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी वडगाव नगरपरिषदेच्यावतीने युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेविका सुनिता पोळ, अलका गुरव, सावित्री घोटणे, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी तलावाच्या पाण्याचे पूजन केले. दरम्यान यादव आघाडीच्या नेत्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका विद्या पोळ यांनी तलावातील पाण्याचे पूजन केले. यावेळी पालिका कर्मचारी शिवाजी सलगर, सुप्रिया गोडेकर, सुधीर धनवडे, अमर कराडे, सविता जाधव आदी उपस्थित होते.









