पुलाची शिरोली / वार्ताहर
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरोली एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवाईमध्ये सुमारे बावीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी बाळासो ऊर्फ बाळू युवरा गावडे ( वय ३० रा. मेन रोड, पुलाची शिरोली, ) व नामदेव कृष्णा गावडे ( ५० रा. धनगर गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) यांच्यावर शिरोली एमआयडीसी ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी नामदेव गावडे यांच्यातील गुटख्याच्या पुड्या जप्त करून सुमारे दहा हजार नऊशे पन्नास रुपयांचा माल हस्तगत केला. तर त्यानंतर अवघ्या पाऊण तासात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गावातील मुख्य रस्त्यावरील बाळूमामा बेकर्स या दुकानात छापा टाकून अकरा हजार चारशे चाळीस रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी जर्दा विक्रीसाठी कायद्याने प्रतिबंध केला आहे. असे असतानाही शिरोली परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्री करणाऱ्या मुख्य मार्गावरील पाच पान टपऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र यामध्ये मिळालेला मुद्दे माल अतिशय कमी होता. त्याच अनुषंगाने आज शिरोली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तिक रित्या ही कारवाई केल्याचे समजते.









