गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी संशयीत आरोपीकडून 22 हजाराची लाच घेताना अटक
प्रतिनिधी/कोल्हापूर
गुन्ह्यामध्ये मदत करतो असे सांगून गुन्ह्यातील संशयीत आरोपीकडून 22 हजाराची लाच घेताना पन्हाळा पोलीस ठाण्याच्या एका सहायक फौजदाराला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी गुरुवारी रात्री रंगेहाथ पकडले. उमेश आनंदराव जाधव ( वय 54, रा. शुक्रवार पेठ, डी वॉर्ड, कुंभार गल्ली, कोल्हापूर ) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपधीक्षक अदिनाथ बुधवंत म्हणाले, तक्रारदाराविरोधी पन्हाळा पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसापूर्वी भा.द.वि.स.कलम 353 व अन्य कलमान्वे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयाचा तपास सहायक फौजदार उमेश जाधव यांच्याकडे आहे. त्यांनी या गुन्हयात मदत करतो असे सांगून, तक्रारदारकडे 25 हजाराची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 22 हजाराची लाच रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी गुरुवारी रात्री सापळा लावून रंगेहाथ पकडले.









