प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोना संसर्गाची साखळी तुटण्याऐवजी वाढतच चालली आहे. पन्हाळा तालुक्यातदेखील गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. आज आणखी तीन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्येने अर्धशतक पुर्ण करत 52 पर्यंत मजल मारली आहे. विशेषत:तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाने जोरदार मुसुंडी मारल्याचे चित्र समोर आले आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी पश्चिम भागातील कंरजफेण गावातील एकाच कुटुंबातील आठ जण त्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोन अशी एकुण 10 रुग्ण आढळले आहेत. त्यातच आज कंरजफेण च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुक्याची मोठ्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या कोतोली गावात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर वारनुळ गावात देखील एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. तसेच पोखले येथील एक रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी पोखले येथे एक रुग्ण आढळला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. अशा प्रकारे तालुक्यात आज दुपारपर्यंत तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्यने अर्धशतक पुर्ण केले आहे. सध्या तालुक्यात एकुण 52 रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील 28 जण कोरोनामुक्त झाले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 23 रुग्णांवर सीपीआर, कोल्हापुर येथे उपचार सुरु आहे.
दरम्यान, पन्हाळा तालुक्यात दिवसगणित कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनासमोर आवाहान उभे राहिले आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून यातील कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांचे स्वॅब तपासणीचे काम चालू असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.








