प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई दूरदर्शनवर पहिली लावणी सादर करण्याचा मान मिळालेल्या नृत्यांगणा मंगला विधाते (वय 70) यांचे आकस्मिक निधन झाले. त्या कोल्हापुरातील उत्तरेश्वर प्रासादिक, वाघाची तालीम येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिन, भावजय, मेहूणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल कला क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
मंगला विधाते यांनी लहानपणापासून कथकनृत्य, नृत्यअलंकाराचे धडे घेतले होते. तबलाविभुषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर हे त्यांचे पहिले गुरू होते. विधाते यांनी वयाच्या 11 व्या वर्षी ‘ज्ञानेश्वर’ नाटकात मुक्ताईची भूमिका केली होती. तसेच मुंबईतील मधुकर निराळे निर्मित ‘आतुन किर्तन वरून तमाशा’ यात मंगला विधाते मुख्य नर्तीका होत्या. गाढवाचं लग्न या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती. मुंबई दूरदर्शनवर पहिली लावणी सादर करण्याचा मान त्यांना मिळाला होता.
त्यांचे पती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दिनेश साखरे यांच्यासोबत विधाते यांनी ‘महादेवाचा नंदी’, ‘अंटीने वाजवली घंटी’ यासह अन्य मराठी चित्रपटात भुमिका केल्या होत्या. क्लासिकल आणि वेस्टर्न नृत्यावर त्यांचे प्रभुत्व होते. विनोदी भूमिका करण्यात त्या माहिर होत्या. कोल्हापुरात त्यांनी ओंकार कलापथक स्थापन केले होते. या कलापथकाला रसिक प्रेक्षकातून मोठी दाद मिळत होती. त्यामुळेच पुडचे पाऊल म्हणून विधाते यांनी कलापथकाचे ऑर्केस्ट्रामध्ये रूपांतर केले. त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, जायंटस् ग्रुप ऑप कोल्हापूर आणि कलापथक निर्माता संघाच्या सदस्य होत्या.









