भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील
सरकारने कटाकक्षाने लक्ष ठेवण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला धन्यवाद दिले. मात्र अंमलबजावणी करताना `जीआर’मध्ये मेख मारु नका असे आवाहनही त्यांनी केले. या प्रश्नावर नोकरशाही नीटपणे काम करते की नाही याकडे सरकारने कटाकक्षाने लक्ष ठेवले पाहिजे. अशी सूचनाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवण्याबरोबर केस जिंकण्यासाठी तयारी करावी. माराठा आरक्षणात विरोधी पक्ष सरकारसोबत असेल याचा पुनउच्चार ही त्यांनी केला.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मंगळवारी मंत्रीमंडळाने मोठे निर्णय घेत मराठा समाजाला मोठा दिलासा दिला, विषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली.
चांगल्यासाठी दोघेही यापुढे काळजीपूर्वक लढू
स्थगिती मिळाल्यानंतर, मराठा समाजासाठी आम्ही विविध मागण्या केल्या होत्या. मूळ आरक्षण मिळेपर्यंत केंद्र सरकारचे 10 टक्के आरक्षण सुरू करा, असा आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. त्यानुसार मंगळवारी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. समाजाला दिलासा मिळाला असे सांगत ते म्हणाले, आमच्या सरकारने 642 अभ्यासक्रमांच्या फीमध्ये सवलत दिली होती. नवोदीत उद्योगासाठी 10 लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून भरण्याचा निर्णय घेतला होता. युपीएससी शिष्यवृत्ती, ग्रामीण दोन हजार तर विद्यार्थ्यांना तीन हजार निर्वाह भत्ता दिला जात होता. सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालना दिली महाविकास आघाडीने यापैकी बहुतांशी सवलती सूरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केवळ विरोधक म्हणून नाहीतर चांगल्यासाठी दोघेही यापुढे आरक्षणासाठी काळजीपूर्वक आणि नीट लढू, अशी भूमिका त्यांनी मांडली.









