लिक्विड ऑक्सिजनसाठी सीपीआर प्रशासनाची पळापळ
450 हायरिस्क रूग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर,
ऑक्सिजनसाठी प्रशासनाची परजिल्ह्यात मागणी
5 लिक्विड कंपन्यांकडे पुरवठ्यासाठी पत्रव्यवहार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यासह परजिल्ह्यातून सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना हायरिस्क रूग्ण उपचारासाठी येत आहेत. या रूग्णांसाठी सीपीआरमध्ये 20 हजार किलो लिटर्सचा जंबो ऑक्सिजन टँक आहे. पण दोन दिवसांत तो 60 टक्क्यांपर्यत रिक्त होत आहे. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनसाठी सीपीआर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने परजिल्ह्यातील 5 कंपन्यांकडे लिक्विड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. लिक्विड ऑक्सिजनच्या नियमित पुरवठ्यासाठी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱयानी देव पाण्यात घातले आहेत.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत पाचशेहून अधिक कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 450 हायरिस्क रूग्णांसाठी जंबो ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. त्याचा लाभही रूग्णांना होत आहे. पण रूग्णांना हायफ्लो गतीने ऑक्सिजन देण्यात येत असल्याने दोन दिवसांत हा टॅक 60 टक्के खाली होत आहे. त्यामुळे टँकमधील ऑक्सिजनची पातळी पाहून किती दिवस, तास तो पुरेल, याचे गणीत सीपीआरमधील वैद्यकीय अधिकार्यांना जुळवावे लागत आहे. त्यानुसार लिक्विड ऑक्सिजनची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱया कंपन्यांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एका कंपनीकडून सीपीआरला ऑक्सिजन पुरवठा होत आहे. अन्य जिल्ह्यातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन सीपीआरला मिळत आहे. पण येणार्या टँकरमधील आवश्यक लिक्विड ऑक्सिजन जंबो टँकमध्ये भरून उर्वरित अन्य हॉस्पिटलना दिला जात आहे. जंबो टँकमधील 30 टक्के ऑक्सिजन राखीव ठेवावा लागत आहे. त्यामुळे रूग्ण वाढल्यास अन् अचानक टँकमधील ऑक्सिजन कमी झाल्यास करायचे काय, या तणावाखाली अधिकारी सतर्कतेने नियोजन करत आहेत. सीपीआरला नियमित ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी सीपीआर प्रशासनाने देव पाण्यात घातल्याची प्रतिक्रिया आहे.
जिल्ह्यासाठी लिक्विडऑक्सिजन पुरवठ्याचे आव्हान
जिल्ह्यात सीपीआर हॉस्पिटलनंतर आता इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन टँक उभारले जात आहेत. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 105 बेडच्या हॉस्पिटलसाठी 6 हजार किलो लिटर्सचा टँक अंतीम टप्प्यात आहे. त्याद्वारे जिल्ह्यात ऑक्सिजनेटेड बेडची संख्या वाढणार आहे. पण याचवेळी या हॉस्पिटल्ससाठी लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
अडीचशे ड्युरा सिलिंडरचा राखीव साठा
‘सीपीआर’मध्ये जम्बो ऑक्सिजन टँक होण्यापुर्वी 500 ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर वापरली जात होती. आजही यातील 250 हून अधिक सिलिंडर राखीव आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी या सिलिंडरचा वापर हायरिस्क रूग्णांसाठी केला जात आहे. अद्यापी काही वॉर्डमध्ये याच सिलिंडरचा वापर होत असल्याची माहिती सीपीआरच्या सुत्रांनी दिली.









