चित्रकलेतुन शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा त्याचा प्रयत्न
वार्ताहर / कुंभोज
सध्या शेतकऱ्यांची बाजू कोणीही मांडत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे वास्तव कुंभोजमधील कुमार मिसाळ यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून मांडले आहे. कुमार मिसाळ यांच्या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने बनवलेला जो पेपर आहे तो त्याच्या शेतामधील टाकाऊ वस्तूंपासून बनवला असून शेतातील निरुपयोगी वस्तूंचा वापर करण्याचा संदेश ही कुमार मिसाळ यांनी कलाकृतीतून दिला आहे.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील चित्रकार कुमार पांडुरंग मिसाळ याच्या शेतीमधील टाकाऊ वस्तूंपासून कागदाची निर्मिती करत आहे आणि त्याच कागदावर तो शेतकरी राजाची व्यथा मांडण्याचा प्रयत्नदेखील करत आहे. कुमारच्या या चित्राचे प्रदर्शन सध्या दिल्लीतील स्टीर आर्ट गॅलरी, न्यू दिल्ली येथे भरले आहे.
दिल्ली येथे दरवर्षी इन्सेप्शन आर्ट ग्रांट (Inception art grant) हा कला क्षेत्रांमधील गुणवान कलाकारांना पुरस्कार देण्यात येतो. या ग्रांटच्या सिलेक्शनसाठी संपुर्ण भारतातून अर्ज येतात. यावर्षी सुमारे पंधराशे अर्ज भारतातून दाखल झाले होते. त्यामधून 23 कलाकारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या कलाकारांच्या कलाकृती एक्झिबिशनसाठी स्टीर आर्ट गॅलरी, न्यू दिल्ली (STIR ART GALLERY, NEW DELHI) येथे मागवण्यात आल्या व त्या कलाकृतींचे परीक्षण करण्यात आले. या 23 कलाकारांमधून दोन कलाकारांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. यामध्ये कुंभोज गावचे सुपुत्र कुमार मिसाळ इन्सप्शन आर्ट ग्रांट या पुरस्काराचा मानकरी ठरला. कुमारच्या या कलाकृतीला 50 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
सध्या दिल्लीमध्ये त्याच्या या कलाकृतीचे चित्र प्रदर्शन सुरू आहे. कुमारच्या या यशाबद्दल कुंभोजसह पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.