रुग्णवाहिका संजय पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली सुफूर्त
प्रतिनिधी / जयसिंगपूर
नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केल्यानंतर, आज डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने ही रुग्णवाहिका कृषीमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय पाटील यड्रावकर यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्त करण्यात आली.
राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रुग्णवाहिका देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तत्काळ शिंदे यांनी विनंती मान्य केली होती. त्यानुसार आज शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी मंगेश चिवटे यांच्या विशेष प्रयत्नाने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने सुसज्ज रुग्णवाहिका जयसिंगपूरसाठी देण्यात आली.
यावेळी कृषीमंत्री . दादा भुसे, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मंगेश चिवटे, नगरसेवक राहुल बंडगर, जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजू मालू आदि उपस्थती होते. रुग्णांच्या सोयीसाठी त्वरित उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेबद्दल यड्रावकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले, तसेच याबाबत विशेष प्रयत्न करणारे मंगेश चिवटे यांना धन्यवाद दिले. सदर रुग्णवाहिकेमुळे जयसिंगपूर आणि परिसरातील रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविणे शक्य होणार आहे.