मंत्रालयातील तपासणीनंतर शिक्षण मंत्रालयाला अहवाल न पाठवल्याचा परिणाम
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारीच दोषी
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा तपासणी अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण मंत्रालयाला वेळेत पाठवलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९ महाविद्यालय अनुदानास पात्र यादीतून वगळण्यात आली आहेत. अनुदान मिळणार या अपेक्षेवर गेल्या २० वर्षापासून कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे भविष्य अंधारमय झाले आहे.
जानेवारी महिन्यात अनुदानास पात्र यादीसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केली होती. हा तपासणी अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंत्रालयात वेळेत पाठवणे अपेक्षित होते. मात्र शिक्षण सहाय्यक संचालक व वरिष्ठ लिपिक यांनी मंत्रालयाला लेखी अहवाल वेळेत सादर केला नाही, असा आरोप शिक्षकांकडून होत आहे. जिल्ह्यातील १०९ महाविद्यालयात जवळपास ११०० प्राध्यापक व ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या प्राध्यापकांचा संसार उघड्यावर पडला. संच मान्यतेमध्ये दुरूस्ती करणे आवश्यक असताना शिक्षण सहाय्यक संचालकांनी जाणूनबुजून दुरूस्ती केली नाही, असाही आरोप केला जात आहे. शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर तातडीने अहवाल मंत्रालयात पाठवला, परंतु वेळेत न आल्याने हा अहवाल मंत्रालयाने फेटाळला आहे. परिणामी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळाणार की नाही, हा प्रश्न अधांतरीच आहे.
शिक्षण सहाय्यक संचालकासह लिपिकाची हकालपट्टी करा
कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी होऊनही तपासणी अहवाल शिक्षण सहाय्यक संचालकांनी वेळेत मंत्रालयात पाठवला नाही. त्यामुळे अनुदानास पात्र यादीत जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे नाव समाविष्ट झालेले नाही. रविवारी आमदार आसगावकर यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा तपासणी झाली. मात्र ही महाविद्यालये अनुदानास पात्र यादीत कधी येणार हा प्रश्न आहे. त्यामुळे दोषी शिक्षण सहाय्यक संचालक व वरिष्ठ लिपिकाची हकालपट्टी करावी.
– खंडेराव जगदाळे (महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती)
| लवकरच पात्र यादी जाहीर होणार अनुदानास पात्र अद्यादेशात कोल्हापुरातील कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती प्राप्त नसल्याचे जाहीर झाले. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सहसचिव काझी, कक्ष अधिकारी लक्ष्मण सावंत यांच्याबरोबर चर्चा करून कनिष्ठ महाविद्यालयातील कागदपत्रांची तपासणी रविवारी पूर्ण केली आहे. सोमवारी यादी तयार करून लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाईल. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. शिक्षक आमदार जयंत आसगावकर |
| नियमानुसार कारवाई करणार शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई केली आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. नियमानुसार प्रशासकीय कारवाई करणार. शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे |








