वैयक्तिक शौचालयासाठी ग्रा.प.कडून पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून देशाच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता व हागणदारी मुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटूंबांनी स्वत:हुन वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याबाबतची मागणी आपल्या ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे सादर करावी, असे आवाहन जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योजनेसाठीचे जे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र परंतु, त्या कुटुंबाचे यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही सर्व्हे किंवा यादीमध्ये नाव समाविष्ट नाही. तसेच सद्यस्थितीस शौचालय सुविधा उपलब्ध नसलेल्या व अद्याप कोणत्याही योजनेतून शौचालय बांधकामासाठी अनुदान घेतलेले नाही, अशा पात्र कुटुंबांचा या विशेष मोहिमेमध्ये समावेश होणार आहे. दरवर्षी एप्रिल व ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या कुटुंबाकडे अद्याप शौचालय नाही व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पात्र कुटुंबाचा शौचालय बांधकाम मोहिमे मध्ये समावेश होणार आहे. ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती स्तरावरुन पडताळणीनंतर पात्र नावे निश्चित केली जातील.









