प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 373 जण कोरोनामुक्त झाले. तर 73 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 41 हजारांवर पोहोचली तर सात महिन्यांनंतर प्रथमच पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 100 च्या खाली आली आहे. दिवसभरात 486 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 312 जणांची अँटीजेन टेस्ट केली. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 46881 तर कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 154 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने 78 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. दरम्यान, शिरोळ, गगनबावडा, आजरा तालुक्यात सोमवारी एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आला नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात सोमवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 486 जणांची तपासणी केली. सध्या 4 हजार 169 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 254 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 228 निगेटिव्ह तर 24 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 312 रिपोर्ट आले. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये भादवण आजरा येथील 72 वर्षीय महिला, सुभाषनगर कोल्हापूर येथील 53 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटल्समध्ये आंबोली सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील 80 वर्षीय महिला, नातेपुते, सोलापूर येथील 72 वर्षीय महिला, ओरोस बुदुक, कुडाळ सिंधुदुर्ग येथील 56 वर्षीय पुरूष, तांबवे वाळवा सांगली येथील 62 वर्षीय पुरूष, शेणवडे गगनबावडा येथील 70 वर्षीय महिला आणि संभाजीनगर कोल्हापूर येथील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 558 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 753, नगरपालिका क्षेत्रात 329, महापालिका क्षेत्रात 348 तर अन्य 128 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 383 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 41 हजार 154 झाली आहे. भुदरगड 2, चंदगड 3, गडहिंग्लज 2, हातकणंगले 8, कागल 4, करवीर 7, पन्हाळा 4, राधानगरी 4, शाहूवाडी 1, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहर 23 आणि अन्य 10 असे 73 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleडॉ. दीपा श्रावस्ती यांना पीएच. डी. पदवीप्रदान
Next Article मच्छीमारांना सापडला दुहेरी डोक्याचा शार्क









