जिल्हा परिषदेकडे दाखल अन् तातडीने वितरण
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी चौथ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यातील 11 लाख 40 हजार लाभार्थ्यांसाठी गुरूवारी 98 हजार 800 डोस दाखल झाले आहेत. त्याचे केंद्रनिहाय वितरणही तातडीने करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील 225 लसीकरण केंद्रंावर गुरूवारी या लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना, दुसऱया टप्प्यात पोलीस महसूल कर्मचाऱयांना तिसऱया टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांना लस देण्यात आली आहे. आरोग्यसेवक व पंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 225 केंद्रांवर 45 वर्षांवरील सर्वाना लस देण्यास सुरूवात झाली. या पार्श्वभुमीवर सकाळीच जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 98 हजार 800 डोस आले. त्याचे लसीकरण सुरू होण्यापुर्वीच प्रत्येक केंद्रांवर वितरण झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अनेक केंद्रांवर 45 वर्षांवरील लाभार्थ्यानी लसीकरणासाठी गर्दी केली, अनेक ठिकाणी रांगा लागल्या, दुपारपर्यत अनेक केंद्रांवर दिलेल्या उद्दिष्टानुसार लस देण्यात आली होती, त्यामुळे अनेकांना दुसऱया दिवशी लसीकरणासाठी येण्यास सांगण्यात आले आहे.
प्रत्येक केंद्राला 100 डोसचे उद्दिष्ट आहे. एका 5 एमएलच्या डोसमध्ये प्रत्येकी पाँईट 5 एमएल लस दिली जाते, एका डोसमध्ये 10 लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. हा डोस असलेली बाटली निश्चित तापमानात ठेवावी लागते, ती फ्रीझरमध्ये ठेवल्यास अधिक थंड होऊन गोठण्याचा धोका आहे. त्यामुळे फ्रीझरशेजारी बर्फापासून दोन बोंटावर ती ठेवल्याने ती सुरक्षित रहात आहे. यासंदर्भात काही लसीकरण केंद्रांवर अफवांना ऊत आला, पण केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱयांनी तो दूर केला.
जिल्ह्यात लस वाया जाण्याची टक्केवारी घटली
जिल्ह्यात फेब्रुवारीत या डोसच्या वाया जाण्याची टक्केवारी 7.5 टक्के होती, ती आता मार्चअखेरीस 5.4 टक्क्यांवर आली आहे. नव्या गाईडलाईन्स अंमलात आल्याने हे शक्य झाले आहे. आता प्रत्येक केंद्रावर शेवटच्या टप्प्यात लाभार्थ्यांची संख्या पाहून नव्या डोसची बाटली वापरा, दहापेक्षा कमी लाभार्थी असतील तर त्यांना दुसऱया दिवशी लसीकरणाला बोलवा, अशा सुचना दिल्या आहेत. कारण अखेरच्या टप्प्यात 10 पेक्षा कमी लाभार्थी आल्यास शिल्लक लस वाया जाण्याचा धोका आहे, त्यामुळे ही सुचना केल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.