लसीकरण केंद्रांत नोंदणी ते निरीक्षण 5 टप्पे, प्रत्येक केंद्रावर 100 कोरोना योद्ध्यांना लस
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
जिल्ह्यात शनिवारी, 16 रोजी कोरोना प्रतिबंधक लस चाचणीला प्रारंभ होत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळात जिल्ह्यातील 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. सर्व आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालयांत लसीकरण होणार आहे. नोंदणी, व्हेरिफिकेशन, ऍपवर अपलोड, लसीकरण, निरीक्षण असे टप्पे राहणार आहेत. रिऍक्शन आल्यास निरीक्षण कक्ष सज्ज आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबावे लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस दाखल झाली आहे. लसिकरणासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापूर शहरातील 5 आणि जिल्ह्यातील 6 अशा 11 केंद्रांवर लाभार्थीची नोंदणी, पडताळणी, लसीकरण आणि निरीक्षण रूम अशी यंत्रणा तेथे उभारली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयांत लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
कोल्हापुरात 5 केंद्रांवर लसीकरण
महापालिका आरोग्य विभागांतर्गत शहरात 5 ठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये महाडीक माळ आरोग्य केंद्र 6, सदर बाजार आरोग्य केंद्र 9, सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्र 1, पंचगंगा हॉस्पिटल आरोग्य केंद 4, राजारामपुरी आरोग्य केंद्र 3 यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 6 केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात सीपीआर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज, सेवा हॉस्पिटल कसबा बावडा, कागल ग्रामीण रूग्णालय, शिरोळ ग्रामीण रूग्णालय येथे लसीकरण होणार आहे.
अत्यावश्यक उपचारासाठी सीपीआर, फुले हॉस्पिटलमध्ये यंत्रणा
लसीकरणानंतर अपवादात्मक रिऍक्शन आल्यास पर्यायी उपचार यंत्रणा सज्ज आहे. यामध्ये प्राथमिक टप्प्यात आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये यांचा ऍडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन (ए.ई.एफ.आय.) मध्ये समावेश आहे. दुसऱया टप्प्यात उपजिल्हा रूग्णालये, सेवा रूग्णालये आहेत. तिसऱया टप्प्यात टर्शरी म्हणून सीपीआर हॉस्पिटल, महापालिकेचे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल यांचा समावेश आहे.
लसिकरणाला जनतेने प्रतिसाद द्यावा ः डॉ. देसाई
लसीकरणानंतर लाभार्थ्यांला साधारण ताप येणे, लसीकरण केलेल्या ठिकाणी वेदना होणे सामान्य आहे. त्यामुळे कोरोना योद्धÎांनी घाबरून जाऊ नये. अर्थात यावर औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीला जनतेने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी पेले आहे.
चार कक्षांत अशी होणार लसिकरणाची प्रक्रिया
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पुर्वनोंदणी केलेला लाभार्थी केंद्रात आल्यानंतर पहिल्या कक्षात तिच्या कागदपत्रंाची पडताळणी होणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांचे फोटो आयडी प्रुफ, बँक पासबुक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तपासले जाणार आहे. दुसऱया रूममध्ये कोव्हॅक्सिन ऍप कक्षात कोव्हीन ऍप सॉप्टवेअरमध्ये व्हेरीफिकेशन केले जाणार आहे. तेथे माहिती ऍपवर अपलोड केली जाणार आहे. तिसऱया कक्षात लाभार्थ्याला लस दिली जाणार आहे. यावेळी लस दिल्यानंतर पुढील लस संदर्भात लाभार्थ्यांला मोबाईलवर मॅसेज मिळणार आहे.
निरीक्षण कक्षात एएफआय कीट, वैद्यकीय स्टाफ
चौथ्या रूममध्ये निरीक्षण कक्ष असणार आहे. येथे अर्ध्या तासाला 20 लाभार्थी यानुसार 20 खुर्च्या, 4 बेडची यंत्रणा असणार आहे. अर्ध्या तासाला 10 या पद्धतीने लाभार्थी निरीक्षण कक्षात लस घेतल्यानंतर अर्धा तास निरीक्षणाखाली राहणार आहेत. या सर्व ठिकाणी रिऍक्शन आल्यास एएफआय कीट, इंजेक्शन्स, कॅप्सुल असणार आहेत. लसिकरणाचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. व्हॅक्सिन सुरक्षित असून शनिवारी प्रत्येक केंद्रांवर ते पोहोच होणार आहे.