प्रतिनिधी / शाहूवाडी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेले जिल्हाबंदी आदेश तसेच साथरोग आपत्ती नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बापलेकाविरुद्ध शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरराव कोळेकर, (वय ७१, रा. मिरज, जि. सांगली) गजेंद्र कोळेकर (मुळगांव मिरज, सद्या रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. बांबवडे गावचे सरपंच सागर कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरज येथील शंकरराव कोळेकर हे काही दिवसांपूर्वी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना बांबवडे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या मुलाकडे राहायला आले होते. वास्तव्यादरम्यान येथे ते आजारी पडले असता त्यांना स्थानिक खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर प्रकृतीत फरक न पडल्याने ते पुन्हा विनापरवाना मिरज हद्दीत दाखल झाले. तेथे केलेल्या स्वॅब चाचणीत शंकरराव कोळेकर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याबाबत कोरोनावाहक ठरल्या प्रकरणी शंकरराव कोळेकर तसेच त्यांना स्थानिक कोरोना समितीच्या परवानगीशिवाय आश्रय दिल्याप्रकरणी गजेंद्र कोळेकर या बापलेका विरुद्ध तहसीलदार गुरू बिराजदार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निरंकारी यांच्या सूचनेनुसार सरपंच सागर कांबळे यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याची दखल घेऊन संबंधितांवर साथरोग नियंत्रण आणि व्यवस्थापन कायद्यानुसारगुन्हा दाखल करण्यात आला








