रात्री 8 ते 11 या वेळेत केवळ पार्सल सुविधा देण्यास मुभा : उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह भरारी पथकाने केली पाहणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवार, 28 मार्च पासून रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत राज्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने, मॉल्स, हॉटेल्स बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. केवळ हॉटेल्सला सायंकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत पार्सल सुविधा देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या नियमाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह महापालिकेच्या भरारी पथकाने शहरातील कावळा नाका परिसरातील हॉटेलची पाहणी केली. जमावबंदीचा आदेश तोडणाऱ्या हॉटेल्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त आडसूळ यांनी दिला.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी भरारी पथकासह कावळा नाका परिसरातील हॉटेलची अचानक तपासणी केली. कावळा नाका ते शिरोली नाका परिसरातील व कावळा नाका ते रेल्वे उडडन पूल या पसिरातील हॉटेलांची तपासणी केली. यावेळी काही ठिकाणी मास्कचा वापर न केलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये पार्सल व्यतिरिक्त व्यवसाय सुरु आहे का याची तपासणी केली. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आणि पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
नो मास्क नो एंट्री फलक न लावल्यास कारवाई
शहरातील जे दुकानदार, हॉटेल व्यवसाईक आपल्या व्यवसायाच्या बाहेरील बाजूस नो मास्क नो एन्ट्री असे फलक लावणार नाहीत. त्यांच्यवारही कडक कारवाई केली जाईल. नियमभंग करणाऱया व्यापाऱयांचा व्यवसाय सील करण्याची करवाई केली जाईल, असा इशाराप्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.









