वारणा कापशी / वार्ताहर
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे. एरव्ही शेतकरी ऊसाला तोड मिळवण्याच्या विवंचनेत असायचा. परंतू चालू हंगामात ज्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहेत त्या गावातील शेतकऱ्याला ऊसतोडीसाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. ग्रामपंचायतीचे उमेदवार किंवा पॅनेल प्रमुख मतांची जोडणी लावण्यासाठी ऊसाला तोडणी देण्याचा कार्यक्रम राबवताना दिसत आहेत.
ग्रामीण भागात बऱ्यापैकी ऊसावर राजकारण चालते याचा प्रत्यक्ष प्रत्यय आलेला दिसत आहे. गावातील पुढारी मंडळी आपल्या राजकीय गटाच्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडीस प्राधान्य देत आहेत. याशिवाय वाहतूक कंत्राटदार स्वतः किंवा त्यांच्या घरातील सदस्य ग्रा.प.उमेदवार असेल तर फक्त आपल्या वार्डातील मतदार शेतकऱ्यांच्या ऊसास तोडी देवुन मतांची जोडणी करत आहेत. त्यामुळे साखर कारखाण्यांचे तोडणी विस्कळीत होत आहेत. शेती खात्यास प्रोग्रॅम राबवणे अवघड जात आहे.
शाहुवाडी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका लागल्या आहेत. त्यापैकी आठ ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. ज्या गावात निवडणूका लागल्या आहेत तिथे मात्र प्रचार शिगेला पोहचला आहे. कोपरा सभा आयोजित करून आपल्या पॅनेलचा प्रचार सुरू आहे. मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेवुन उमेदवार आपली भुमिका मांडत आहेत. तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारणाला महत्व आहे. विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार सत्यजीत पाटील, करणसिंग गायकवाड, व मानसिंग गायकवाड या चार गटात मतदारांची विभागणी झालेली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत तगटातटाच्या राजकारणाला महत्व प्राप्त झाले आहे. गावापरत्वे वेगवेगळ्या आघाड्या व युत्या झालेल्या आहेत.
असे जरी असले तरी ऊस हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे. ऊस लागण करणे सोपे झाले आहे ,पण ऊस कारखाण्यास पाठवणे फार अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे ऊस या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर उमेदवारांचा डोळा आहे. ज्याच्या घरी मतांच गठ्ठा आहे त्याच्या ऊसास ‘तोडणी ‘ देऊन मतांची ‘जोडणी ‘ करत असल्याचे चित्र ग्रामिण भागात दिसत आहे.