जि.प.सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांचा आरोप, माहिती अधिकारातून उघडीस आला मोठा भ्रष्टाचार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या ८८ कोटींच्या साहित्य खरेदीमध्ये तब्बल ३५ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी केला. जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी कोरोना साहित्य खरेदीतून संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत:बरोबरच नेत्यांच्या पुरवठादार नातेवाईकांची `सोय’ केली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य आणि केंद्रसरकारने या घोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करून दोषींकडून अपहाराची रक्कम वसूल करावी. अन्यथा याविरोधात जनहित याचिका दाखल करून न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवला जाईल, असा इशाराही नाईक-निंबाळकर यांनी दिला.
नाईक -निंबाळकर म्हणाले, कोरोना साहित्य खरेदी ही पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने केली आहे. आपत्कालीन स्थितीत खरेदी मर्यादा ही एक कोटी रूपयांची असताना या बाबीकडे जाणिवपूर्वक दूर्लक्ष करून विभागीय आयुक्त अथवा प्रधान सचिवांच्या परवानगीशिवाय ८८ कोटींची खरेदी केली आहे. सदरची खरेदी प्रक्रिया ही जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीस अधीन राहून केली नसून ई-टेंडर प्रक्रिया राबवालेली नाही. ज्या पुरवठादारांनी साहित्य पुरवले आहे, ते जीएसटी कायद्यांतर्गत रजिस्टर्ड नाहीत. काही पुरवठादारांचे रजिस्ट्रेशन तारीख व त्यांच्याकडून केलेल्या साहित्य खरेदीची तारीख ही एकाच दिवसाची आहे. तसेच रजिस्ट्रेशन झालेल्या दिवशीच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. केवळ साहित्य खरेदीसाठी काही कंपन्या ऐनवेळी सुरु केल्या असून टेक्सटाईल कंपनीकडून थर्मल स्कॅनरचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे २२४ रूपये किंमतीचे ऍन्टिजेन टेस्ट कीट कसबा बावड्यातील एका कोविड केअर सेंटरला देण्यात आले होते. त्याची सुमारे १२०० रूपयांना बाहेर विक्री करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
साहित्य खरेदीसाठी गठीत केलेल्या समितीचे जिल्हाधिकारी दौलत देसाई हे अध्यक्ष, तत्कालिन सीईओ अमन मित्तल सहअध्यक्ष, जिल्हा शल्यचिकीत्सक सदस्य तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे सदस्य,सचिव आहेत. पण साहित्य खरेदी करताना सर्व समिती सदस्यांच्या सह्या न घेता केवळ सहअध्यक्ष असलेले सीईओ मित्तल यांनी स्वत:च्या सहीने सर्व साहित्य खरेदी केले आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व खरेदी ही `तातडीची खरेदी’ या पोट नियमांखाली ई-टेंडर न करता कोटेशन पद्धत वापरून केली आहे. पण या पोटनियामांखाली सुरुवातीची एकच खरेदी ही अतितातडीच्या पद्धतीने करण्यास परवानगी आहे. त्यापुढील प्रत्येक खरेदी ही ई-टेंडर पद्धतीने करणे आवश्यक आहे. शिवाय कोटेशन पद्धतीचा अवलंब करताना बनावट कोटेशन पद्धतीचा वापर केल्याचा आरोपही नाईक-निंबाळकर यांनी केली.
घोटाळ्यामध्ये राजकीय वरदहस्त
नाईक-निंबाळकर म्हणाले, एवढ्या मोठ्या घोटाळ्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यातुन राजकीय वरदहस्त मिळाला आहे. साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार हे नेत्यांचे नातेवाईक असून ते इचलकरंजी आणि कोल्हापूरातील आहेत. त्यांनी दुप्पट किंमतीने साहित्याचा पुरवठा केला आहे.
लेखापरिक्षणातून ताशेरे
साहित्य खरेदी प्रक्रियेच्या लेखापरिक्षणामध्ये सर्व खरेदी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाचे नियम आणि अटी डावलून अवाजवी दराने खरेदी केल्याचे लेखापरिक्षणाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.
माहिती देण्यास केली टाळाटाळ
कोरोना साहित्य खरेदीबाबत माहिती देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर स्थायी समिती सभेमध्ये उपोषणाचा इशारा दिल्यानंतर माहिती दिली असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱयांऐवजी लेखा व्यवस्थापकांची सही
साहित्य खरेदीसाठी गठीत केलेल्या समितीचे सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करून न घेता लेखा व्यवस्थापक नितीन लोहार यांच्या सहीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. साळेंना बाजूला ठेवून साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.