शहरातील कुंभार गल्लींमध्ये बालचमूंसाठी मावळे, तोफा खरेदीसाठी रेलचेल
मावळयांसोबत प्राणी, पक्षी, सैनिक आदी साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध
नंदकुमार तेली / कोल्हापूर
कुंभार गल्लीत सिंहासनारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा, मावळे, तोफा, प्राणी, पक्षी, सैनिक विक्रीसाठी उपलब्ध असून स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच किल्ल्याचे साहित्य व मावळे खरेदीसाठी बालचमूंची रेलचेल सुरू झाली आहे. शहरासह उपनगरातील गल्ली-बोळातील बालचमू किल्ले उभारणी, मजबूत बांधणीत व्यस्त आहेत. दिवाळीसाठी बांधण्यात येणाऱ्या किल्लांवर खडा पहारा देण्यासाठी मावळे सज्ज झाले आहेत.
बालचमूंची खरेदीसाठी रेलचेल
गंगावेश, पापाची तिकटी, दत्त गल्ली, मार्केट यार्ड, बापट पॅम्प आदी ठिकाणच्या कुंभार गल्लीत तसेच प्रमुख मार्ग, चौकांच्या ठिकाणी तयार किल्ले, मावळे व किल्ले उभारताना बालचमूंना किल्ल्यांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 5 रुपयांपासून ते 50 रुपयांचे मावळे कुंभारांनी विक्रीसाठी ठेवले आहेत. कुंभारांनी शाडू मातीपासून बनविलेला मावळा 4 इंच उंचीचा 10 तर 7 इंच उंचीचा 15 रुपयांना आहे.
सांगलीला 75 टक्के साहित्याचा पुरवठा
मावळे, सिंहासनारुढ शिवाजी महाराज, तयार किल्ले आदी कोल्हापुरातील कुंभारांनी तयार केलेल्या साहित्याला सांगलीतून मोठया प्रमाणात मागणी आहे. तयार करण्यात आलेल्या साहित्याच्या सुमारे 75 टक्के साहित्याचा पुरवठा सांगलीला करण्यात येतो. तर इचलकरंजी, कागल आदी ठिकाणीही काही प्रमाणात मागणी आहे. याचबरोबर दोर लावून किल्ल्यांवर चढणारे मावळे, काम करणारे मावळे, बारा बलुतेदार, महिला, प्राणी, पक्षी, सैनिक आदी साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शाडू माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून पुतळे
मावळे, तयार किल्ले, सिंहासनारुढ शिवाजी महाराज आदी किल्ले उभारणीसाठी लागणारे साहित्य प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तर काही शाडू माती पासून तयार करण्यात आलेले आहेत. डोक्यावर पगडी, विविध वेशभूषा, तलवार, ढाल घेतलेले मावळयांची तुकडी सज्ज आहेत. तसेच ब्राँझमध्ये स्वत: मी पणती घेऊन उभारलेल्या देवी, शोभेचे हत्ती व वेलकम स्वागताच्या मुर्ती बनविलेल्या आहेत.
सतीश वडणगेकर, (विशेष कार्यकारी अध्यक्ष – कुंभार समाज ओबीसी संघटना)