बालिंगा उपसा केंद्राचे काम होणार पूर्ण, ए, बी, सी, डी वॉर्डत पाणीपुरवठा होणार सुरू
शिंगणापूर, नागदेवाडी पंपाचे कामालाही सुरवात
प्रतिनिधी / कोल्हापूर
निम्म्या शहरातील पाणीपुरवठा आज, मंगळवारी सांयकाळनंतर सुरू होणार आहे. बालिंगा उपसा केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. बी,सी आणि डी वॉर्डमधील पाण्याचे संकट टळणार आहे. शिंगणापूर आणि नागदेववाडी येथील उपसा केंद्राचे कामाला सुरवात झाली आहे.
महापूराच्या पाण्यात महापालिकेचे बालिंगा, नागदेववाडी आणि शिंगणापूर येथील उपसा केंद्रा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीबाणी आहे. महापालिकेकडून बालिंगा येथील उपसा केंद्र सुरू करण्याचे काम सुरू आहे. एमआयडीसीमध्ये बालिंगा येथील पाठविण्यात आलेल्या मोटारी सोमवारी दुपारी मिळाल्याने मोटारी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे बसविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण करून उपसा सुरू करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी सायंकाळी टाक्या भरल्यानंतर बालिंगा पंपिग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या भागाला पाणी पुरवठा करण्याचे नियाजन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. हे पंपिंग स्टेशन सुरु झाल्यास शहरातील ए, सी, डी व बी वॉर्ड येथे पाणी पुरवठा सुरू होणार आहे.
शिंगणापूर, नागदेववाडी उपसा केंद्राच्या मार्गावर पाणी
शिंगणापूर आणि नागदेववाडी येथील उपसा केंद्राच्या रस्त्यावर अद्यापही पूराचे पाणी असल्यामुळे उपसा केंद्र सुरू होणार अडचण निर्माण झाली आहे. नागदेवाडी येथील मोटारी खोलून बाजूला काढण्यात आलेल्या आहेत. रस्ता खुला झाल्याबरोबर येथील मोटारी हिटींगसाठी पाठविण्यात येणार आहेत. आज मंगळवारी येथील पाणी कमी झाल्यानंतर उपसा केंद्राचे काम सुरू केले जाणार आहे.
चार फुटाच्या पाण्यातून कर्मचारी उपसा केंद्रात
पाणीपुरवठा विभागातील पाच ते सहा कर्मचारी चार फुटातील पूराच्या पाण्यातून बालिंगा उपसा केंद्रात गेले. उपसा सुरू करण्यासाठीचे काम केले. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूराच्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असतानाही त्यांनी काम सुरूच ठेवले.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी
महापालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बालिंगा व नागदेववाडी पाणी उपसा केंद्रांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे उपस्थित होते.’










