उचगाव / वार्ताहर
उचगाव (ता. करवीर ) येथील साई पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या दत्त मंदिर परिसरात पृथ्वीराज भिकाजी भोसले ( रा. वळीवडे ता. करवीर) यांनी पार्क केलेल्या दोन ट्रकच्या चार बॅटऱ्या व दुरुस्तीचे साहित्य असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पृथ्वीराज भोसले यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजता उचगाव येथील साई पेट्रोल पंपाशेजारी दत्तमंदिराच्या परिसरात असणार्या मोकळ्या जागेत आपले ट्रक नंबर एम एच 09-एल.2169 व एम एच 09-ई-9232 पार्क केले होते. त्यातून अज्ञात चोरट्यांनी ४ बॅटरी, वाहने दुरुस्तीसाठी असणारे अवजारे व जॅक असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी सकाळी पार्क केलेले ट्रक माल भरण्यासाठी चालू करत असताना ट्रक का सुरू होईनात म्हणून त्यांनी पाहिले असता ट्रकच्या बॅटऱ्या व साहित्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. पृथ्वीराज भिकाजी भोसले यांनी याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलिस नाईक दिलीप दळवी करत आहेत.









