प्रतिनिधी / आजरा
आज आजरा-गडहिंग्लज मार्गावर आजरा सुतगिरणीजवळ अपघात झाला. या झालेल्या अपघातात देवर्डेतील युवक निलेश मारुती तानवडे हा जागीच ठार झाला. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अज्ञात वाहनाने या युवकाला चिरडल्याने युवकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. निलेश कोल्हापूर जिल्हा दूध संघात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहत होता. यापूर्वी तो वाशी (मुंबई) येथे कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वी त्याची गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाकडे बदली झाली होती.
शुक्रवारी दुपारी निलेश आपल्या दुचाकीने ड्युटीवर निघाला होता. आजरा सूतगिरणी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. एकुलता एक असलेल्या निलेशच्या अपघाती मृत्यूने तानवडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडिल व एक विवाहित बहिण असा परिवार आहे.









